News Flash

उस्मानाबादेत राष्ट्रवादीला भाजपची साथ?

जिल्हा परिषदेवर मागील दहा वर्षांपासून असलेली काँग्रेस-शिवसेनेची सत्ता यंदा राष्ट्रवादीने डळमळीत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

उस्मानाबादचे राजकारण म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध सारे, असे सूत्र ठरलेले. जिल्ह्य़ाच्या राजकारणावर पकड असणाऱ्या डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना नामोहरम करता यावे यासाठी विरोधक नेहमी प्रयत्नशील असतात. मात्र सत्ता देऊनही शिवसेना आणि काँग्रेसची नेतेमंडळी फारसे काही करत नसल्याने या वेळी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला मतदारांनी बळ दिले, मात्र बहुमतासाठी त्यांना दोन सदस्य कमी पडत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी झाली असली तरी जिल्हा परिषदेत हे समीकरण वापरले जाण्याची शक्यता कमी असते. अशा स्थितीत राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी भाजपाचाच पर्याय असू शकतो.

जिल्हा परिषदेवर मागील दहा वर्षांपासून असलेली काँग्रेस-शिवसेनेची सत्ता यंदा राष्ट्रवादीने डळमळीत केली. ५५ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत सर्वाधिक २६ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला २८ हा आकडा गाठण्यासाठी आता तारेवरची कसरत आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी आणि भाजपाने अजमावलेले उमरगा सूत्र पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतही अमलात येण्याची शक्यता आहे. तशी बोलणी राष्ट्रवादी व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. मात्र भाजप, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला २६ जागा मिळूनही पुन्हा विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार आहे.

याव्यतिरिक्त शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा या तीन विरोधी पक्षांनी एकत्रित मोट बांधल्यास राष्ट्रवादीला पुन्हा एकदा सत्तेबाहेर ढकलू शकतात. त्यासाठी तिन्ही पक्षांना एकत्रित बांधण्याचे प्रयत्न काही पराभूत उमेदवारांनी जोरकसपणे सुरू केले आहे. सेनेत सावंतांच्या मनमानीमुळे झालेली बंडाळी, पालिका निवडणुकीत ऐनवेळी शिवसेनेने भाजपाशी केलेला दगाफटका आणि सेनेच्या एका गटाशी अंतर्गत जिव्हाळा साधून असलेली काँग्रेस एकवटण्याची शक्यता कमीच आहे. शिवसेनेतील एका गटाला सावंतांचे नेतृत्व अमान्य आहे, तर राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसमधील अनेकजण इच्छुक आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यास अनुकूलता दर्शवली आहे, मात्र जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आमदार राणाजगजितसिंह पाटील काँग्रेसला विश्वासार्ह मानत नाहीत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या राष्ट्रवादीसमोर सध्या अनेक पर्याय शिल्लक आहेत.

शिवसेनेत सावंत यांच्या विरोधात वातावरण आहे. सावंत एककल्ली नेतृत्वामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्य़ात सध्या गटबाजी वाढली आहे. त्यातून पराभवांची मालिका सुरू झाल्याने सरभर झालेल्या शिवसनिकांनी सावंतांवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या आहेत. या गटबाजीतूनच माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांना निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाप्रमुख पदावरून डच्चू देण्यात आला.

  • जिल्हा परिषदेवर गेल्या दहा वर्षांपासून असलेली काँग्रेस-शिवसेनेची सत्ता यंदा राष्ट्रवादीने डळमळीत केली.
  • ५५ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत सर्वाधिक २६ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळविला. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक २८ हा आकडा गाठण्यासाठी तारेवरची कसरत आहे.

..तर राष्ट्रवादी पुन्हा विरोधी बाकावर

उस्मानाबाद जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरीही जिल्हा परिषदेमध्ये दहा वर्षांपासून काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीने जिल्ह्य़ात पुन्हा एकदा बांधणी करण्यावर भर दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्य़ातील आठपकी पाच पालिकांवर निर्विवाद वर्चस्व गाजवीत मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आली आहे. जिल्हा बँकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही आपण सत्तेत आहोत, एवढय़ा एका समाधानासाठी भाजपा राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी आपल्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगून तसे संकेतही दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:53 am

Web Title: maharashtra elections 2017 ncp bjp
Next Stories
1 साताऱ्यात काँग्रेसची वाताहत
2 डाळींची साठवणूक मर्यादा मार्चअखेपर्यंतच उठवली
3 ऑनलाइन शिष्यवृत्तींचे अर्ज प्रलंबित
Just Now!
X