राज्यातूल रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात असतानाच स्वेच्छा रक्तदात्यांची मात्र शासनाकडून थट्टा केली जात आहे. रक्तदानानंतर रक्तदात्याला तरतरी यावी, यासाठी काही खाद्यपदार्थ दिले जातात. त्यासाठी प्रती रक्तदात्याला शासनाकडून आजही फक्त दहा रुपये अनुदान देऊन बोळवण केली जात आहे, परंतु या अल्प अनुदानात रक्तदात्याला कशी ‘तरतरी’ द्यावी, असा प्रश्न रक्तदान शिबीर आयोजक व शासकीय रक्तपेढीच्या संचालकांनाही पडला आहे.
 संपूर्ण राज्याला सव्वा लाख रक्त पिशव्यांची आवश्यकता असताना फक्त ९० ते ९५ हजारच पिशव्या गोळ होतात. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचा रक्ताअभावी मृत्यू ओढवतो. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे, यासाठी शासनाचा आरोग्य विभाग आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे आवाहन केले जाते. एवढेच नव्हे, तर यासाठीच ऑक्टोबर महिना ‘रक्तदान महिना’ म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे वर्षांच्या इतर महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये जास्त प्रमाणात रक्त गोळा होते, परंतु ते ठराविक दिवसच ठेवता येते. त्यामुळे बाराही महिने रक्तदात्यांनी पुढे आले पाहिजे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. यासाठी स्वेच्छेने पुढे येणाऱ्यास खाद्यपदार्थांसाठी दहा रुपये अनुदान शासनातर्फे दिले जाते. यात एक समोसा, दोन केळी, एक सफरचंद, एक बिस्किट पुडा, चहा किंवा कॉफी दिली जाते. बिस्किट पुडा आणि चहा सोडला तर दहा रुपयात कोणतेच खाद्यपदार्थ आज मिळत नाही. समोसा व अन्य खाद्यपदार्थ पंचवीस रुपये प्लेट, केळी चाळीस रुपये डझन आहेत. अशा स्थितीत रक्तदात्याची चहा किंवा कॉफी किंवा छोटय़ा बिस्किटच्या पुडय़ावर अक्षरशा बोळवण केली जाते. द्यायचेच झाल्यास बरेचदा दोन केळी किंवा एका सफरचंदाचे चार तुकडे करून तेही चार रक्तदात्यांना दिले जातात. यातही तो आनंद व रक्तदान केल्याचे समाधान व्यक्त करून आल्यापावली परततो. शासकीय रक्तपेढीच्या संचालकांना हा प्रकार भयंकर बोच आहे. या अनुदानात वाढ करावी, असे शासनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कळवण्यात आलेले असतानाही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत या क्षेत्रात काम करणारे व्यक्त करतात.
नवी दिल्लीच्या राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. सुनील खापर्डे म्हणाले, केवळ दहा रुपये अनुदान हे महागाईच्या काळात तरी न्यायोचित नाही. यात २५ रुपयांपर्यंत वाढ करण्याचा आमचा मानस आहे.
मुंबईतील महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी काहीही सांगण्यासच नकार दिला. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सदस्य डॉ. राजेश नाईक म्हणाले, या महागाईच्या काळात केवळ दहा रुपये अनुदान देणे म्हणजे त्याचा अपमानच होय. राज्य रक्त संक्रमण परिषदेची नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्याला किमान शंभर रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

.. तेव्हा अत्यंत वाईट वाटते
रक्तदानानंतर दात्याला दहा रुपयात पूर्ण होईल, असे खाद्यपदार्थ द्यावे लागतात. त्यात दोन केळी किंवा चहा असतो किंवा चहा आणि बिस्किटे असतात. अशा वेळी काही स्वेच्छा रक्तदाते ‘नकोत तुमचे हे उपकार’ असे म्हणून बाहेर निघून जातात तेव्हा अत्यंत वाईट वाटते, असे एका शासकीय रक्तपेढीच्या संचालकांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या आर्थिक वर्षांत राज्य रक्त संक्रमण परिषदेतर्फे एका पैशाचेही अनुदान आलेले नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.