विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घेऊन केंद्राकडून राज्याला करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली होती. यावेळी फडणवीस यांनी अनेक दावे करत मदत मिळूनही राज्य सरकारकडून काम केलं जात नाही, असा आरोप केला होता. फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांची महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली.

महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या दाव्यांवर उत्तरं दिली. राज्यात काही दिवसांपासून रेल्वे सोडण्यावरून वाद सुरू आहे. या वादावरून अनिल परब यांनी फडणवीस यांना उत्तर दिलं. “फडणवीस यांनी सांगितलं की, ‘राज्यातून श्रमिकांसाठी ६०० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यासाठी केंद्र सरकारनं खर्च उचलला. एका रेल्वेसाठी केंद्रानं ५० लाखांचा खर्च उचलला,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. आता एका रेल्वेला ५० लाख खर्च कसा येतो? हे फडणवीस यांनी सांगावं. प्रत्यक्षात या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारनं दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाही. श्रमिकांना घरी सोडण्यासाठी संपूर्ण खर्च राज्य सरकारनं केला,” असं परब यांनी सांगितलं.

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदच आभासी होती- अनिल परब

रेल्वेच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं १७८ रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. ३० मे पर्यंत या गाड्या सोडायच्या होत्या. पण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एका दिवसात १४८ रेल्वेगाड्या दिल्या. त्यानंतर काल एकाच दिवसात ४८ रेल्वेगाड्या सोडल्या. परवापर्यंत (२५ मे पर्यंत) सगळं बरं होतं. पण, त्यानंतर मागील दोन दिवसांपासून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूर्वी गाडी सोडण्याच्या एक दिवस अगोदर माहिती राज्य सरकारला दिली जायची. आता सरकारला ते कळवलं जात नाही. काल ११:३० वाजताची रेल्वे १०:३० वाजता सोडली. त्यामुळे मजुरांना ताटकळत बसावं लागलं. गुजरात महाराष्ट्रापेक्षा छोट आहे. पण, १५०० ट्रेन दिल्या, महाराष्ट्राला ६०० ट्रेन दिल्या गेल्या. त्यात रेल्वेच्या वेळा बदलून गोंधळ आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप अनिल परब यांनी केला.