राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. तर, दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले. राज्यात आज ३ हजार ६५ जणांनी करोनावर मात केली असून, २ हजार ५४४ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय आज ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४५ टक्के आहे.

सद्यस्थितीस राज्यात ८४ हजार ९१८ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत १६ लाख १५ हजार ३७९ जणांनी करोनावर मात केलेली आहे. याशिवाय ४५ हजार ९७४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर ८१ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार ६०० वर पोहचली असून यापैकी, ८६ हजार ५२९ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५९९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

स्वदेशी लशींपासून आधुनिक निदान केंद्रांपर्यंत सर्व माध्यमातून भारताने कोविड १९ साथीला एकात्मिक प्रतिसाद दिला असून त्यातूनच या महासाथीवर काही प्रमाणात मात करणे शक्य झाले, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.

दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाली तरी करोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बाधित रुग्णांच्या प्रमाणानुसार जिल्ह्य़ातील रुग्णालयांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने जिल्ह्य़ांना दिल्या आहेत. तसेच करोना आणि बिगरकरोना उपचारांचा मेळ साधण्यासाठी आधुनिक सुविधांसह उपचार विशेष (सुपर स्पेशालिटी) रुग्णालये करोना रुग्णालये म्हणून ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेशही सर्व जिल्ह्य़ांना दिले आहेत. यामुळे अन्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.