राज्यातील महत्त्वाचे रेल्वेमार्ग जोडण्यासाठी  कंपनी स्थापन करून पुढील पाच वर्षांत राज्यातील लोहमार्गासाठी राज्य सरकार दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक टर्मिनस आणि यात्री सुविधा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार शिवराम दळवी, जयानंद मठकर, राजन तेली, प्रमोद जठार आदी उपस्थित होते.
रस्ते, बंदरे, रेल्वे व विमानतळांचा विकास करून कोकणास देशातील आर्थिकदृष्टया समृद्ध प्रदेश बनविण्यास युती सरकार कटिबद्ध आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ-मराठवाडा रेल्वे मार्गानी जोडण्याचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. चिपळूण-कराड, अहमदनगर-बीड, वर्धा-नांदेड असे रेल्वे मार्ग जोडतानाच जयगड, दिघे ही बंदरेदेखील रेल्वेमार्गाने जोडण्यात येणार आहेत.
चिपी विमानतळ गोवा राज्याच्या विमानतळाच्या तोडीचा बनविला जाईल. सीवर्ल्ड प्रकल्प पर्यटनाचा मानबिंदू ठरेल असा विकास करण्यात येणार आहे.  येत्या मार्च २०१६ पर्यंत विमानतळाचे २५०० मीटर कामपूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
‘कोकणात सुबत्ता आणणार’
कोकण रेल्वेत कोकण दिसत नसल्याची खंत कोकणवासीय करत होते. रेल्वेमंत्री बनल्याने कोकण रेल्वेत निश्चितच कोकण दिसेल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कोकणाच्या रेल्वे स्थानकांचा विकास, पश्चिम महाराष्ट्रआणि बंदरे रेल्वे मार्गाने जोडण्यात येणार आहेत. बचत गटांच्या उत्पादित मालास बाजारपेठ मिळवून देणे, कोकणचे र्पयटन सौंदर्यासाठी पावसाळी पर्यटन वृद्धिंगत करून पर्यटन रेल्वे आणण्यावर आपला भर राहील. कोकणी माणसाच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी रेल्वेचा विकास महत्त्वाचा आहे.