महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याचा आरोप करताना सोलापुरातील युवक काँग्रेसच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर दोषारोप ठेवला आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी खरगे यांनी प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदापासून रोखण्याचे राजकीय कारस्थान केले असून त्यांची प्रभारीपदावरून दूर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षात सुशीलकुमार शिंदे यांच्याप्रमाणेच शेजारच्या कर्नाटकातून प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे याच्याकडे पक्षाचे दलित चेहरा म्हणून पाहिले जाते. शिंदे व खरगे यांच्यात पक्षांतर्गत सुप्त संघर्ष असल्याचेही बोलले जाते. त्यातूनच सोलापुरातील शिंदे समर्थकांनी खरगे यांच्यावर थेट आरोप करीत त्यांना महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद न मिळाल्याने सुरू झालेले नाराजीचे नाटय़ आता शिंदे-खरगे यांच्यातील सुप्त संघर्षांपर्यंत पोहोचल्याचे मानले जात आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना यंदाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी अटकळ त्याच्या समर्थकांनी बांधली होती. परंतु त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. त्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले याच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सामूहिक राजीनामे सोपविले आहेत. यावेळी शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनात ‘प्रणिती शिंदे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळे यांनी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर त्याचे खापर फोडले. त्यातून शिंदे-खरगे यांच्यातील सुप्त संघर्षांकडे अंगुलीनिर्देश होत असून त्याची पक्षश्रेष्ठी कितपत दखल घेतात, याकडेही पक्षीय वर्तुळात लक्ष वेधले आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणात स्वत: आमदार प्रणिती शिंदे यांनी, स्वत:ला मंत्रिपद मिळाले नाही, त्याबद्दल आपण अजिबात नाराज नसल्याचा निर्वाळा दिला आहे. पक्षश्रे्ष्ठींचा निर्णय आपण शिरसावंद्य मानतो. मंत्रिपद न मिळाल्याने आपले जे कार्यकर्ते नाराज आहेत, त्या सर्वाची समजूत काढून पक्षादेश व पक्षशिस्त पाळण्याच्या सूचना देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपले वडील सुशीलकुमार शिंदे व मल्लिकार्जुन खरगे यांच्यात कोणताही वाद नाही. त्यामुळे त्यांच्यावर थेट आरोप करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

– रक्ताने लिहिले पत्र 
मंत्रिपदाची संधी न दिल्याने आपण अजिबात नाराज नसल्याचा निर्वाळा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला असला तरी त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी शिंदेनिष्ठा वाहण्यासाठी स्वत:च्या शरीरातून काढलेल्या रक्ताने निषेध पत्र लिहून प्रदेश पक्षश्रेष्ठींना पाठविले आहे.

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्रात नागण ेयांनी प्रणिती शिंदे यांच्यावर अन्याय झाल्याची तक्रार केली आहे.