पावसाळ्याच्या दिवसात साप चावण्याच्या घटना सर्रास घडताना दिसतात. आता साप चावल्यावर त्याच्यापासून दूर पळण्याचा आपण प्रयत्न करतो. पण बीडमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका तरुणाने आपल्याला चावलेल्या सापाला पुढचा बराच वेळ हातात धरुन ठेवले. इतकेच नाही तर या तरुणाने सापासह रुग्णालय गाठले आणि उपचार घेतले. एका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलाईन, अशा स्थितीत हा तरुण उपचार घेत होता.

बीड जिल्ह्यातील २७ वर्षीय लखन गायकवाड या तरुणाला सकाळच्या वेळात साप चावला. त्यानंतर तो चालतच जिल्हा रुग्णालयामध्ये गेला. हा तरुण बीडमधील काळा हनुमान ठाणा परिसरात राहतो. सापासहीत हा रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी काहीसे घाबरले. त्याच्या हातात ५ ते ६ फूट लांबीचा साप होता. मात्र त्याच्यावर उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्याला तत्काळ उपचार केले. लखनच्या हातातील साप घेण्यासाठी सर्पमित्र व पोलीस असलेल्या अमित मगर यांना बोलावण्यात आले. तब्बल अर्धा तास साप हातात घेऊन उपचार घेतलेल्या लखनच्या हातातून अखेर साप वेगळा करण्यात आला. दरम्यान लखन याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.