मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्याची खरी गरज असून सर्वानी देशाचा आणि आपल्या भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी केले. येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था आणि पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या वतीने शनिवारी आयोजित बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.   लेखकाच्या मृत्यूनंतरही त्याचे साहित्य अजरामर असते. कुसुमाग्रजांनी मानवतावादाची शिकवण दिली. त्यांची परंपरा नाशिककरांनी चालवावी. जातीधर्माच्या भिंती पाडून टाकाव्यात, असा उपदेश करतानाच वैद्य यांनी मुलांना चांगले लिहा आणि चांगले वाचा, असा संदेश दिला. मराठीतून बोलण्याचा, मराठीचा अभ्यास करण्याचा आणि मराठीतून स्वाक्षरी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.  व्यासपीठावर डॉ. अनिल अवचट, किशोर पाठक, विनायकदादा पाटील, लोकेश शेवडे, मविप्रचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. बालसाहित्य संमेलन सुरू करण्यामागे साने गुरुजींची प्रेरणा असल्याचे सांगून, यापुढे दरवर्षी २४ डिसेंबर हा साने गुरुजींचा जन्मदिन मविप्र संस्था बालसाहित्य संमेलनाने साजरा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. अवचट यांनी मुलांशी संवाद साधताना ‘पसायदान’ ही सर्वात मोठी कविता असून तिच्यात जीवनाचे सार असल्याचे मत मांडले. आपणास आलेल्या रोजच्या अनुभवातून मनुष्याला शहाणपण येते. साहित्य हे मनुष्याला शहाणे करते. मनुष्याला मनुष्य बनविणारे साहित्य हे दर्जेदार असते, असे त्यांनी सांगितले. यावेळी कवी किशोर पाठक यांनी सण आला बाई, अगडबंब, आजीचा बटवा, झुंबड आली झुंबड या कविता सादर केल्या. दुपार सत्रात निमंत्रित विद्यार्थी कवींनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी केले.