विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांत आज खासदार समर्थकांनी मूकमोर्चा काढत पुढचे पाऊल टाकले. सुमारे तीसहून अधिक संघटनांनी राजवाडय़ापासून मूकमोर्चा काढून रामराजेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.
रामराजे आणि खा. भोसले यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वैयक्तिक आणि पूर्वजांची उणीदुणी काढणा-या प्रतिक्रिया सध्या या दोन गटांकडून व्यक्त होत आहेत. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या निवडणुकीपेक्षा भोसले आणि निंबाळकर यांच्यातच निवडणूक असल्याचे वातावरण सध्या दिसत आहे. सध्या या दोन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
या घडामोडीत खा. भोसले समर्थकांनी शनिवारी मूकमोर्चाचे आयोजन केले होते. रामराजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बठकीस येणार होते. त्यांच्या समोर शक्तिप्रदर्शन करणे हा हेतू होता, मात्र रामराजेंनी या बठकीकडे पाठ फिरवल्याने हा हेतू पूर्णपणे साध्य होऊ शकला नाही. मात्र सकाळी अकरा वाजता राजवाडा येथून मूकमोर्चास प्रारंभ होऊन शेकडो समर्थकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले. या वेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या घराण्याविषयी गेले काही दिवस विविध कार्यक्रमांत, सार्वजनिक ठिकाणी विधान परिषदेचे सभापती रामराजे आक्षेपार्ह विधाने करत आहेत. आमच्या या घराण्याबद्दल आदराच्या भावना आहेत. त्यांच्याबद्दल काढलेले अपमानकारक शब्द जनता कधीही सहन करणार नाही. खरेतर ‘सातारा बंद’चा आमचा विचार होता, मात्र खा. भोसले यांनी सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरण्याचे आवाहन केल्याने आम्ही शांततामय मार्गाने मोर्चा काढत आहोत, मात्र रामराजे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागून भविष्यात अशी वक्तव्ये करू नयेत अन्यथा होणा-या जनक्षोभास ते जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.