|| प्रशांत मोरे, सागर नरेकर
४० कुटुंबांचा संसार चार वर्षे उघडय़ावर..; एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष
ठाणे जिल्ह्य़ातील शहरांसाठी वाढीव पाणीपुरवठय़ाचे एकमेव आशास्थान असलेल्या बारवी धरण विस्तारीकरण प्रकल्प मार्गी लागण्यात प्रमुख अडचण असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात एमआयडीसी प्रशासनाने अक्षम्य दिरंगाई केली असून, त्यामुळे यंदाही जादा पाणीसाठा होण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. विशेष धक्कादायक म्हणजे संपूर्ण कोकण विभागात कातकरी उत्थान मोहीम राबवली जात असताना मुरबाड तालुक्यातील बारवी धरणाकाठी असणाऱ्या तोंडली गावातील कातकरी कुटुंबांची अर्धवट पुनर्वसनामुळे वाताहत झाली आहे. उघडय़ावर संसार आलेल्या या कातकरी कुटुंबांना रोजचे जगणेच मुश्कील झाले आहे.
चार वर्षांपूर्वी घरात पाणी शिरल्यावर गावाबाहेर सुरक्षित अंतरावर स्थलांतरित झालेल्या तोंडली कातकरी वाडीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत एमआयडीसी प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे गेली चार वर्षे ही मंडळी गावाबाहेर योग्य पुनर्वसनाची वाट पाहत आहेत.
सहा महिन्यांची तात्पुरती सोय आहे, असे सांगून त्यांना स्थलांतरित करण्यात आले होते. सध्या तोंडली गावात जाणाऱ्या पुलालगत तात्पुरत्या झोपडय़ा बांधून ही सुमारे ४० कातकरी कुटुंबे राहत आहेत. नावापुरता आसरा असणाऱ्या या झोपडीत दिवस काढणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा येथील रहिवाशांनी झाडाखालच्या सावलीत बसून काढला. आता पावसात तर त्यांचे जगणे अधिकच मुश्कील झाले आहे. अंधाऱ्या खोपटात ओल आली आहे. त्यात बाहेरही बसायला जागा नाही. अशा परिस्थितीत दिवस काढायचे कसे, असा सवाल सखुबाई ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पाणी वाढल्याने २०१५ मध्ये येथील कातकऱ्यांना नेसत्या वस्त्रानिशी घर सोडावे लागले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांना केवळ दोनदा उदरनिर्वाहासाठी धान्य आणि पैसे (खावटी) देण्यात आले. त्यानंतर वारंवार तक्रार अर्ज केल्यानंतर गेल्या आठवडय़ात त्यांच्या खोपटावर प्लास्टिक अंथरण्यात आले. विजेची व्यवस्था करण्यात आली. योग्य निवारा आणि पूर्ण मोबदला न मिळाल्याने या कातकरी कुटुंबांची अवस्था सध्या दयनीय आहे. गावातील सवर्ण कुटुंबांच्या दबावामुळे एमआयडीसी प्रशासन आमचे पुनर्वसन करीत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्या कुंदा दहिया यांनी केला.
गावातील चांगले प्रस्थ असणाऱ्यांना मुरबाडजवळ घरे देण्यात आली आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला वीस हजारांपेक्षा अधिक खावटी मिळते. मात्र कातकऱ्यांनाच या गोष्टींपासून डावलले जाते. गावाबाहेरची ही जागा दलदलीची आहे. आसपास जंगल असल्याने विंचू, साप इतर जनावरे फिरतात.
अशा काळात लहान मुलांच्या सुरक्षेसाठी रोजगार सोडून घरी बसावे लागते. घरी बसले तर खायचे काय, असा प्रश्न असतो, अशी संतप्त प्रतिक्रिया अनंता मुकणे व्यक्त करतात. पावसात खराब पाणी पिल्याने काही महिन्यांपूर्वी अनेक मुलांना आणि मोठय़ांना आजार झाले होते. यावर तोडगा कधी निघणार, असा सवाल श्रावण मुकणे उपस्थित करतात.
तातडीने सुविधा देणार
प्रकल्पग्रस्तांची जमीन आणि घरांचे मूल्यांकन करण्यासाठी शिखर समितीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातून लवकरात लवकर मार्ग निघेल. दरम्यान, कातकरी वस्तीमध्ये सर्व प्राथमिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यांना खाटा, टेबल फॅन, ताडपत्री दिली आहे. नियमितपणे पेस्ट कंट्रोल करीत आहोत. पावसाळ्यात त्यांची विशेष काळजी घेतली जाईल, अशी माहिती एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.