दूध आंदोलनावरून खासदार राजू शेट्टी यांनी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर टीका केली आहे. महादेव जानकर यांना किती अधिकार आहेत, याचीच मला शंका आहे. त्यांचे कोणीच ऐकत नाही. त्यांनी दुधाला २७ रूपये दर देण्याचे जाहीर केले. पण त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. दूधाच्या टँकरला पोलीस संरक्षण देऊ असे ते म्हणतात. पण हे ते स्वत: बोलत नसून त्यांच्या बोलण्यामागे कोणीतरी आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. दुधाच्या टँकरला पोलीस संरक्षण देण्यात येईल असे सांगत राजू शेट्टींना आंदोलन थांबवायचे नसल्याचा आरोप जानकर यांनी केला होता. शेट्टींनी जानकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

जानकर हे सातारामधील दुष्काळी भागातून आले आहेत. त्यांनी याची जाण ठेवावी. आंदोलन चालू ठेवण्याची आम्हाला हौस नाही. पण जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. ही जानकरांची भाषा नाही. त्यांच्या या भाषेमागे दुसराच कोणीतरी आहे. त्याचे ऐकून जानकर बोलत असल्याचा आरोप करत त्यांना किती अधिकार आहेत याचीच आपल्याला शंका असल्याचा टोला लगावला. विशेष म्हणजे राजू शेट्टी आणि महादेव जानकर हे जुने सहकारी आहेत. पण सध्या दोघांची भूमिका ही परस्पर विरोधी असल्याचे दिसून येते.

दरम्यान, आपण चर्चेस तयार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले. तसेच विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्याचे जाहीर केल्यास लगेच आंदोलन मागे घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले.