बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे २० वर्षांपासून बेपत्ता असलेले राजाराम पोचूजी बोनगिरवार (४१) हे इंटरनेटमुळे घरी परतू शकले आहेत. बोनगिरवार हे कोलकाता येथे सापडले होते. रविवारी त्यांना चंद्रपूरमध्ये आणण्यात आले असून २० वर्षांनी राजाराम घरी परतल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

कोठारी येथील रहिवासी असलेले राजाराम बोनगिरवार १९९८ मध्ये अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा बराच शोध घेतल्यानंतरही ते मिळाले नाहीत. मात्र, अशातच २० वर्षांनंतर आठ दिवसांपूर्वी कोलकाता कॉकद्वीप येथील रहिवासी अम्रीश नागबिश्वास यांनी कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्याशी संपर्क साधला. ‘मकरसंक्रांती मेळाव्यात गंगासागर येथे एक वृद्ध व्यक्ती आजारी पडलेली दिसून आली. या वृद्ध व्यक्तीकडे विचारणा केली असता तो फक्त कोठारी एवढेच सांगत आहे’, असे नागबिश्वास यांनी ठाणेदारांना सांगितले. त्यानंतर नागबिश्वास यांनी इंटरनेटद्वारे माहिती घेतली असता कोठारी या गावाची माहिती मिळाली. या आधारे त्यांनी कोठारी पोलिसांशी संपर्क साधला होता. कोठारी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य समजून जुने रेकार्ड शोधले असता १९९८ मध्ये राजाराम बोनगिरवार हे बेपत्ता असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी कोलकाता येथे नागबिश्वास यांच्याशी संपर्क साधला. सर्व चौकशीनंतर ही व्यक्ती राजाराम बोनगिरवार आहेत, हे स्पष्ट झाले. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस पथक कोलकाता येथे रवाना केले. त्यानंतर बोनगिरवार यांना सुखरूप ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे आणले. मानसिक अस्वस्थतेमुळे ते घरदार, संसार सोडून भटकत राहिले. रविवारी संध्याकाळी चंद्रपूर पोलिसांनी राजाराम यांना कुटुंबाच्या स्वाधीन केले. वीस वर्षांनंतर घरातील व्यक्ती परत आल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.