मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडून आमदार लंके यांचे कौतुक

पारनेर : तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात हजारो करोनाबाधितांवर मोफत उपचार करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांची सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी ओळख राज्यात निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शेगाव येथे बोलताना केले.

करोना संसर्गाच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शेगाव येथे मंत्री शिंगणे, आमदार लंके तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने करोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री डॉ. शिंगणे बोलत होते.

डॉ. शिंगणे म्हणाले की, करोना कळात अनेक आमदारांनी काम केले. मात्र २४ तास काम करणारे नीलेश लंके हेच एकमेव आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत याचा वेगळा आनंद मला आहे. निवडणुकीत आपण सगळे एकमेकांविरोधात लढतो. मात्र शरद पवार यांना अभिप्रेत असणारे, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेला अनुसरून आमदार लंके काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल राज्याने, देशाने व जगाने घेतली आहे, असे डॉ. शिंगणे म्हणाले. ज्यावेळी आपल्या भागातील माणूस अडचणीत येतो त्यावेळी त्यांच्यासाठी सर्व काही झोकून देऊन काम करणे हे लोकप्रतिनिधीचे काम असते, असे डॉ. शिंगणे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री धनंजय मुंडे यांच्याप्रमाणेच आमदार लंके  यांच्या सामाजिक कामाची, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ राज्यातील तरुणाईला पडली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा, खानदेशात आमदार लंके राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘स्टार प्रचारक’ असतील. तशी तयारी पक्षाने सुरू केली आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणे, मंत्री, अन्न व औषध प्रशासन