गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरील खर्चावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. स्मारकावरील खर्च २, २९० कोटी रुपये इतका असून हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला असून हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार करण्यात आला असून नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१३ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्मारकाचे आता लोकार्पण होणार आहे. या पुतळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावरुन राज ठाकरेंनी मंगळवारी व्यंगचित्रातून भाजपाला फटकारले.

व्यंगचित्रात नरेंद्र मोदी हे स्मारकाचे लोकार्पण करताना दिसतात. याप्रसंगी वल्लभभाई पटेल यांच्या मनात काय भाव असतील, हे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. ‘तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना’ असे विचार वल्लभभाई पटेल यांच्या मनात येत असावे, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे. पुतळ्यावर २, २९० कोटी रुपये खर्च करणे हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल ?, असा सवाल राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे विचारला आहे.

राज ठाकरे यांनी वेळोवेळी व्यंगचित्राद्वारे भाजपावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सीबीआयमधील वादावरुन थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.