मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे गरजेचे आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याचा दाखला देत राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारले आहे.

राजकीय पक्षांमधील अंतर्गत लोकशाहीवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केले होते. भाजप मुख्यालयात ‘दिवाळी मिलन’ समारंभात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले होते. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत नेहमीच चर्चा होते, मात्र त्यांची विचारसरणी, मूल्य तसेच अंतर्गत लोकशाहीबाबत फारशी चर्चा होत नाही असेही त्यांनी म्हटले होते.

मोदींच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात नरेंद्र मोदी, अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. मोदी हे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्याला ‘माझे मत पटतंय का?’ असे दरडावून विचारताना दिसत आहेत. या व्यंगचित्रात नितीन गडकरी यांना भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. राज ठाकरेंनी रेखाटलेले हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून वारंवार मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. महात्मा गांधी जयंती, लक्ष्मीपूजन, सोशल मीडियावरील परतीचा ‘पाऊस’ आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप या व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला आहे.

काही महिन्यांपूर्वी खासदार नाना पाटोले यांनीही मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. मोदी उत्तर न देता फक्त खासदारांना प्रश्नच विचारत सुटतात असे त्यांनी म्हटले होते.