“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येत गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचं स्वागत करतो. राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर, त्यांना तिथे शिवसेनेने केलेलं कार्य दिसेल” असे संजय राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं.

“अयोध्येत आपलं दैवत, अस्मिता आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याने, कार्यकर्त्यांने अयोध्येला गेलं पाहिजे. राम मंदिरासाठी या देशातल्या हिंदुंनी जो लढा दिला, त्यात शिवसेनेचाही सहभाग होता. त्याच्या खूणा तिथे दिसतील” असे संजय राऊत म्हणाले.

“गेल्या दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले. त्यातून नवीन आंदोलन सुरु झालं, त्याचा परिणाम म्हणून राम मंदिर होताना दिसतय” असे संजय राऊत म्हणाले. तिथे गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु असे संजय राऊत यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही मुलाखत घेणार ?
देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही मुलाखत घेणार अशी चर्चा होती. त्या संदर्भात तुमची भेट देखील झाली होती त्यावर संजय राऊत म्हणाले की, इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रात संवाद तोडत नाही. विरोध असतो तो विचारांचा विरोध असतो आणि बघू, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद आहेच. मुलाखत होणारच आहे. पेपर फुटणार नसून थेट रिझल्टच बघायला मिळेल.

मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते
राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर ते म्हणाले की, विरोधकांनी धार्मिक राजकारण केलं. त्यामुळे मंदिरे उघडावी लागली. परंतु आता जे रुग्ण वाढताहेत त्याचं उत्तर ते देणार आहेत का ? मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांना संकटाची कल्पना होती. म्हणून त्यांनी हळू हळू एक एक गोष्ट सुरू करण्याची भूमिका घेतली.