राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरीत पावसामुळे धोका निर्माण झाला असून एनडीआरएफची पथकं दाखल झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची भीती आहे तर दुसरीकडे चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये घरं, बाजारपेठेत पाणी शिरलं असून दोन बोटींच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुुर करण्यात आलं आहे. याशिवाय रायगड, ठाणे येथेही पावसाने धुमाकूळ घातला आहे.

मुंबईलाही पावसाने झोडपलं असून जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाची सरासरी ८४० मिमी असताना यंदा मात्र १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सांताक्रूझ येथे १०३२.२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत कुलाबा येथे नोंदवला गेलेला पाऊसही दीर्घकालीन सरासरीच्या जवळपास म्हणजेच ७६१.६ मिमी इतका आहे. दरम्यान गुरुवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Petrol Diesel Price Today 16 April 2024
Petrol Diesel Price Today: पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वाची बातमी; इंधनाचे नवे दर जारी
Petrol Diesel Price Today 15 April 2024
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात बदलले इंधनाचे दर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये
Petrol Diesel Price Today 5 April 2024
Petrol Diesel Price Today: पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वाची बातमी इंधनाचे नवे दर जारी
Petrol Diesel Price Today 29 March 2024
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त? मुंबई-पुण्यात किती पैसे मोजावे लागणार?

हवामान खात्यानं मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील काही ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Live Blog

19:54 (IST)22 Jul 2021
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणातून १०,०९६ क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

19:13 (IST)22 Jul 2021
खडकवासला धरणातून ५११८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे २४६६ क्युसेक वेगाने सुरु असलेला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. संध्याकाळी ७ पासून खडवासला धरणातून ५११८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

18:50 (IST)22 Jul 2021
मुसळधार पावसाने एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम; ४८ गाड्या रद्द केल्याची मध्य रेल्वेची माहिती

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ३३ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. ५१ गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. ४८ रद्द केल्या गेल्या आणि १४ गाड्या उशिराने धावत आहेत आल्या. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रॅकखालील खडी वाहून गेली आहे. तसेच ट्रॅक वॉशआऊट्स इ. नुकसान झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

17:14 (IST)22 Jul 2021
कर्जत ते खोपोली दरम्यान रेल्वे ट्रॅक अधांतरी

सीएसमटी ते खोपोली लोकल मार्गावरील केळवली व डोलवलीदरम्यान २ किमीच्या रेल्वे ट्रॅकखालील खडी वाहून गेली आहे.

17:02 (IST)22 Jul 2021
कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफची २ पथके दाखल

16:48 (IST)22 Jul 2021
रायगडमध्ये पुराच्या पाण्यात वडिल आणि मुलगी वाहून गेली

कर्जत तालुक्यातील दामत येथे सकाळी इब्राहिम मुनियार (४०) झोया मुनियार (५) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. घरात पाणी शिरल्याने सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी घराबाहेर पडले असता पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे नदीत वाहून गेले आहेत. अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही

16:39 (IST)22 Jul 2021
चिपळूण तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात साचले पाणी; अंतर्गत मार्ग बंद
16:19 (IST)22 Jul 2021
महाडमध्ये पूरस्थिती कायम; मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत

16:01 (IST)22 Jul 2021
कसारा घाटातील दरड हटवली; रेल्वे सेवा पूर्ववत
15:58 (IST)22 Jul 2021
खडकवासला धरणात पावसाचा जोर कायम राहिल्यास संध्याकाळी मुठा पात्रता पाणी सोडलं जाण्याची शक्यता

खडकवासला धरणाची दुपारी ३ वाजता पाणी पातळी १९०९.४० फूट (५८१.९९ मी.) झाली असून धरणामध्ये १.७५ TMC (८८.५२%) पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज ठीक दुपारी ४.३० वाजल्यापासून २४६६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आज संध्याकाळी धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. विसर्ग कमी असला तरी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

15:44 (IST)22 Jul 2021
कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील २ ते ३ दिवस हवामान विभागाचा अलर्ट

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील २ ते ३ दिवस हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने २२ ते २६ जुलै पर्यंत गंभीर हवामानाचा इशारा दिला आहे

15:05 (IST)22 Jul 2021
कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवड्यासाठी पुढील ३६ तास महत्वाचे

कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवड्यासाठी पुढील ३६ तास महत्वाचे आहेत. उद्या रात्री ११.३० वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा.

14:45 (IST)22 Jul 2021
कोविड केंद्रातील २१ रुग्णांचा जीव धोक्यात

चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात २१ रुग्ण आहेत. येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहे. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली आहे. कोविड सेंटरच्या चारही बाजूने पाणी असल्यामुळे आतमध्ये प्रवेश करणे शक्य नाही त्यामुळे रुग्णांना दुपारचे जेवण किंवा इतर मदत कार्य करण्यास अडथळे येत आहेत

14:44 (IST)22 Jul 2021
चिपळुणात पुराचे २ बळी?; आपत्कालीन मदतीचे साहित्यही पाण्यात, संपर्क यंत्रणा ठप्प

चिपळूण शहरात पावसाचा जोर कायम असल्याने दुपारीही पूरपरिस्थिती कायम आहे. पाण्याची पातळी वाढत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असून दुसरी वाहून गेल्याची माहिती आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

14:20 (IST)22 Jul 2021
चिपळूण शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली

चिपळूण शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. ८ ते १० फूट पाणी साचलं आहे. अनेक लोक वरच्या मजल्यांवर स्थलांतरित होत आहेत. 

14:17 (IST)22 Jul 2021
कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली; आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी

कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने जिल्ह्यातील नद्यांची धोका पातळीवरून वाढण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात नद्यांना आलेला पूर पाहून पूरग्रस्त भागातील लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन केले जात आहे. यासाठी कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी भर पावसात पूरग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पूर्ण बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लि करा

13:56 (IST)22 Jul 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा घेतला आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा घेतला आढावा. रायगड, रत्नागिरी, सिधुदूर्गचे जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी केली चर्चा. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश दिले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अतिरीक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांना दिले.'

13:38 (IST)22 Jul 2021
कोकणातील पूरस्थितीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आढावा बैठक

कोकणातील पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितित आढावा बैठक सुरू आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारीही बैठकीला उपस्थित आहेत. 

13:33 (IST)22 Jul 2021
आमदार ऋतुराज पाटलांची पूरग्रस्तांशी चर्चा

कोल्हापुरात पूरग्रस्त बाधितांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं आवाहन. आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या आयुक्त, प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.   

13:21 (IST)22 Jul 2021
कोकणात प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे, प्रवीण दरेकर संतापले

कोकण पूर्पणणे उद्ध्वस्त झालं आहे. सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. गेल्या १० दिवसांपासून आम्ही मुंबईची तुंबई झाल्याचं सांगत आहोत. दरड कोसळून लोकांचे मृत्यू होत आहेत. सरकारने आतातरी जागं व्हावं आणि पूर्वनियोजन करा असं सांगत असतानाही झालं नाही. म्हणून कोकणाला आज मोठा फटका बसला आहे. महाड, चिपळूण, संगमेश्वर ही शहरं पाण्याखाली आली आहेत. संपूर्ण कोकणात पावसाने हैदोस घातला असून प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडली आहे असा संताप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत होते.

13:02 (IST)22 Jul 2021
कर्नाटकचा कोल्हापूर-सांगलीकरांना दिलासा

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला. अलमट्टीतुन 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून कोल्हापूर -सांगलीला दिलासा मिळाला आहे.

12:52 (IST)22 Jul 2021
रत्नागिरीहून चिपळूणसाठी स्पीड बोट रवाना

चिपळूणसाठी सरकारने रेस्क्यू प्लॅन तयार केला आहे. रत्नागिरीहून चिपळूसाठी स्पीड बोट रवाना झाली आहे. एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डची टीम चिपळूणात दाखल होईल. कोस्ट गार्डच्या हॅलिकॅाप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे. पुढील आठवडा पुरेल इतका अन्न धान्यांची व्यवस्था केली जाणार आहे. तसंच जिवितहानी होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. 

12:46 (IST)22 Jul 2021
"गंभीर स्थिती असलेल्या घटना स्थळी लवकरात लवकर हेलिकॉप्टर सुविधा पोहचविण्याचे आदेश"
12:43 (IST)22 Jul 2021
चिपळूणमध्ये बोटींच्या सहाय्याने बचावकार्याला सुरुवात
12:41 (IST)22 Jul 2021
बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार - विजय वडेट्टीवार 

एनडीआरएफच्या दोन टीम रत्नागिरीला, पालघर, अलिबाग, सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये तैनात केल्या जाणार आहेत. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

12:14 (IST)22 Jul 2021
चिपळूण एसटी स्टँड पाण्याखाली

12:11 (IST)22 Jul 2021
"चिपळूण शहराची अवस्था अत्यंत भयावह, मदतीसाठी धाव घ्या"

चिपळूण शहराची अवस्था अत्यंत भयावह आहे. सरकारी मदतदेखील कमी पडणार आहे. ही मदत अपुरी पडणार असल्याने पूर ओसरल्यानंतर सर्वांनी मदतीसाठी धाव घ्यावी असं आवाहन चिपळूणमधून शिवसेना पदाधिकारी बाळा कदम यांनी केलं आहे. 

11:57 (IST)22 Jul 2021
सांगलीच्या शिराळा येथील मांगले कांदे पूल पाण्याखाली

सांगलीच्या शिराळा येथील मांगले कांदे पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

11:55 (IST)22 Jul 2021
चिपळूणमध्ये २००५ च्या महापुरापेक्षा जास्त पाणी

चिपळूणमध्ये २००५ च्या महापुरापेक्षा जास्त पाणी. ८ फुटांपेक्षा जास्त पाण्याची पातळी.

11:52 (IST)22 Jul 2021
सांगलीमधील वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस

सांगलीमधील वाळवा तालुक्यात व विशेषतः वारणा नदीच्या कॅचमेंटमध्ये सतत पाऊस सुरु आहे
1. नदीचे पाणी पात्र भरून वाहत आहे. अद्याप पात्राबाहेर आलेलं नाही.
2. ऐतवडे खुर्द - निलेवाडी पुलावर पाणी आले असून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पर्वतवाडी येथील परिस्थिती नियंत्रणात आहे
 3. कणेगावकडून भरतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारपर्यंत पाणी येईल असा अंदाज आहे.

11:44 (IST)22 Jul 2021
हाय टाइड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती

स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. रत्नागिरीमधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अशा तीन बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय साधण्यात येत आहे.

11:39 (IST)22 Jul 2021
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद

लांजा तालुक्यात आंजणारी पुलाखालून पाणी वाहत असल्याने वाहतूकीसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. काजरघाटीच्या रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूकीसाठी रस्ता बंद विलवडे वाकड पूल पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद  पाचल येथील तळवडे पाणी शिरल्याने अंशतः नुकसान जीवीत हानी नाही.  गणेशवाडी रायपाटण रोडवर पाणी असल्याने वाहतूकीस रस्ता बंद करण्यात आला आहे

11:39 (IST)22 Jul 2021
रत्नागिरी ते सोमेश्वर - लोणदे - चिचखरीला जाणारा मार्ग बंद आहे.  

खेड शहरात मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मदत कार्य सुरु आहे. खेर्डी येथील महावितरणचे ३ कर्मचारी उपविभागीय विद्युत कार्यालयात पाणी शिरल्याने अडकून पडले आहेत. भोर- वरंधा मार्गावर पाणी शिरल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.  हानी ना बावनदीचे पाणी निवेखुर्द येथे रस्त्यावर आल्याने रस्ता बंद आहे. धामणी येथे पुराचे पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. रत्नागिरी ते सोमेश्वर - लोणदे - चिचखरीला जाणारा मार्ग बंद आहे.  

11:39 (IST)22 Jul 2021
रत्नागिरीत पावसाचं थैमान, महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली

रत्नागितीर मुसळधार पावसानं थैमान घातलं असून खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरला पुरस्थिती गंभीर आहे. रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये येथे एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली.

11:21 (IST)22 Jul 2021
सीएसएमटी ते बदलापूर लोकल सेवा पु्न्हा सुरळीत
11:11 (IST)22 Jul 2021
रायगडमधील महाड शहरात पुराचा पहिला बळी

रायगडमध्ये गच्चीवरुन पडून एकाचा मृत्यू झाला आहे. गच्चीवरुन पूर पाहत असताना तोल जाऊन खाली ५० वर्षीय व्यक्ती खाली पडला. महाडच्या रोहिदास नगर भागात ही घटना घडली आहे. संजय नारखेडे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. महाडच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

10:58 (IST)22 Jul 2021
पोलादपूर तालुक्यातील मोरझोत धबधब्याचे अक्राळविक्राळ रूप
10:54 (IST)22 Jul 2021
सिंधुदुर्गात नदी नाल्यांना महापूर 

वैभववाडी-मांडकुली परिसरात झालेल्या जोरदार पावसाने गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर पाणी. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प. सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

 कुडाळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन आंबेरी  पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. सावंतवाडी तालुक्यात शिरशिंगे येथे पुलावर पाणी आल्याने सदर गावात जाणारी वाहतूक बंद झाली आहे.  वैभववाडी तालुक्यातील करूळ  व भुईबावडा घाट  मार्गाने होणारी वाहतूक बंद आहे. फोंडा घाट व आंबोली घाट मार्गाने कोल्हापूर येथे होणारी वाहतूक सुरू आहे.

10:06 (IST)22 Jul 2021
एनडीआरएफची तुकडी पुण्याहून तासाभरात चिपळुणात पोचणार

पावसामुळे चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती असून एनडीआरएफची तुकडी दाखल होणार आहे. पुण्याहून तासाभरात चिपळुणात पोहोचणार आहे.

10:05 (IST)22 Jul 2021
लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; 24 तासात तब्बल 390 मिमी पावसाची नोंद

लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 390 मिमी पाऊस कोसळला असून अक्षरशः लोणावळाकरांना झोडपून काढलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचले होते शिवाय अनेकांच्या घरात पाणी देखील शिरल असल्याच्या घटना घडल्या आहेत. तर ढग फुटी सदृश्य परिस्थिती झाल्याची माहिती टाटा धरण प्रमुख यांच्याकडून देण्यात आली असून अवघ्या 3-4 तासात तब्बल 150 ते 175 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.