शेतकऱ्यांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीड पट हमी भावा द्यावा, अशी मागणी करणारे विधेयक आता संसदेत मांडण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे.

दिल्लीत संसद भवन येथे ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती या देशातील १९३ शेतकरी संघटनांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार शेट्टी यांच्या वतीने देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते.
शेतकऱ्यांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीडपट हमीभाव मिळावा, या प्रमुख मागणीकरिता संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात खासगी सदस्य विधेयक मांडण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटना तसेच शेट्टी यांच्या हालचाली सुरू होत्या. यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना सामावून घेण्याचेही प्रयत्न सुरू होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर शेट्टी म्हणाले, देशभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या विधेयकाच्या मंजुरीसाठी ठराव करण्याचा निर्णय झाला. तसेच या सर्व ठरावाच्या प्रति राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांना पाठवल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संपूर्ण देशभर रान उठवण्यात येईल. १० मे रोजी १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाला १६१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचे औचित्य साधून देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निदर्शने करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाने सत्तेमध्ये येताना शेतकऱ्यांना जी आश्वासने दिलेली होती, ती अद्यप पाळलेली नाहीत, अशी टीका देखील त्यांनी केली. शेतकऱ्यांनी दीड पट हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती यासाठी त्यांना सत्तेत बसवले आहे. तो शब्द त्यांनी पूर्ण करावा, शेतकऱ्यांची ही दोन विधयके आहेत, त्यास त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा, अन्यथा हेच शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील, असा इशारा त्यांनी दिला.

बुधवारी झालेल्या बैठकीस शरद पवार यांच्यापासून देशातील विरोधी पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावल्याने बैठकीस महत्त्व प्राप्त झाले. खा. शरद यादव, खा. अरविंद सावंत, जयप्रकाश यादव, खा. नरेंद्रकुमार, माजी खा. दिनेश त्रिवेदी, कृषिमूल्य आयोगचे माजी अध्यक्ष टी हक, दीपेंद्रसिंग हुडा, जयंत चौधरी आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती.