प्रशांत देशमुख

सार्वजनिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याची ख्याती असणाऱ्या खासदार रामदास तडस यांनी विकासकामात अडथळा आणत असल्याचा आक्षेप घेत माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांच्याशी घेतलेला पंगा चांगलाच चर्चेत आला आहे. आज (रविवार) दुपारी बारा वाजता ही घटना देवळी येथे घडली.

देवळी परिसरात पालिकेतर्फे विकासकामे सुरू आहेत. यावेळी नालीचे खोदकाम सुरू असतांना जागेवरून वाद झाला. ही जागा आपल्या मालकीची असल्याने खोदकामासाठी आपली परवानगी अनिवार्य असल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक अशोक काकडे यांनी दावा केला. तर देवळी पालिकेने ही जागा सार्वजनिक असल्याने परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट करीत खोदकाम सुरू केले. हा वाद न्यायालयातही सुरू असल्याचे समजले. मात्र, याच प्रकरणात आता चांगलीच ठिणगी उडाली.

हे खोदकाम थांबविण्यासाठी काकडे यांनी शनिवारपासून विरोध दर्शविणे सुरू केले होते. त्यांनी कामास खोडता घातल्याची तक्रार खासदारांकडे गेली. देवळी पालिकेत खासदार तडस यांच्या नेतृत्वातील भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे तडस यांनी मोठा निधी पालिकेच्या कामासाठी उपलब्ध करून दिला. त्यातूनच चालणारे काम अडविण्यात आल्याबद्दल ते संतप्त होते. आज पुन्हा काकडे यांनी खोदकामाच्या जागेवर विरोध सुरू केला. हे ऐकताच विदर्भ केसरी राहलेल्या तडस यांचा पारा चांगलाच भडकला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काकडे व तडस यांच्यात बाचाबाची झाली. काकडे यांनी खासदारांना उद्देशून अपशब्द उच्चारल्यावर तडस हे थेट काकडे यांच्या अंगावर धावून गेल्याचे म्हटले जाते. तसेच त्यांनी दगड उचलून दरडावल्याची चर्चा आहे. तोडीच तोड काकडे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. शेवटी घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी एकीकडे तडस यांना विनंती करीत थांबविले. तर दुसरीकडे काही पोलिसांनी खड्ड्यात उभ्या असलेल्या काकडे यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी तडस तसेच काकडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी दिली. या संदर्भात बोलतांना खासदार तडस म्हणाले, “विकास कामात विनाकारण अडथळा आणणे चुकीचेच आहे. त्याबद्दल पालिका प्रशासनाने वारंवार संबंधिताला समजावले परंतू त्याने न जुमानल्याने मी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न केला.”