भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अखेर नगर लोकसभा मतदारसंघाकडे पाठच फिरवली. प्रामुख्याने त्यांना मानणा-या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांत त्यांनी सभा घेण्याचे शेवटपर्यंत टाळल्याने या दोन तालुक्यांत हा चर्चेचा विषय बनला आहे. सोमवारी दुपारी पाथर्डी येथे त्यांची सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, प्रत्यक्षात ही सभा रद्दच झाली.
विशेष म्हणजे मुंडे यांनी राज्यातील बारामती, नांदेड अशा दूरच्या मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, मात्र शेजारच्या व त्यांचे विशेष सख्य असलेल्या नगर मतदारसंघाकडे मात्र त्यांनी ठरवून पाठ फिरवली. लोकसभेच्या नगर मतदारसंघातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यांमध्ये मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषत: पाथर्डी तालुक्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या तालुक्यात वंजारी समाजाचे चांगल्यापैकी प्राबल्य असून त्यावर मुंडे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच मुंडे यांची सभा पक्षाच्या उमेदवाराच्या दृष्टीने कायमच महत्त्वाची मानली जाते. यंदा मात्र त्यांनी येथे तर नाहीत, नगर मतदारसंघातच कुठे सभा घेतली नाही, दौराही केला नाही.
भाजपचे उमेदवार खासदार दिलीप गांधी व मुंडे यांच्यातील वितुष्टामुळेच मुंडे यांनी यंदा नगरकरडे विशेषत: पाथर्डी-शेवगावकडे साफ दुर्लक्ष केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे हे पक्षात मुंडे समर्थक म्हणूनच ओळखले जात. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपत असताना ढाकणे यांनी गांधींच्या विरोधात उघड भूमिका घेताना त्यांना उमेदवारी देऊ नये अशीच जाहीर मागणी केली होती. मात्र या मोहिमेत त्यांना यश न आल्याने अखेर त्यांनी पक्षच सोडला. त्याच वेळी त्यांनी गांधी यांनी मुंडे यांना डावलून उमेदवारी आणल्याचा आरोप केल्यानंतर गेल्या काही दिवसांत ही गोष्ट प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवली. मुंडे यांचीही पाथर्डीला सभा न झाल्यामुळे त्यांना मानणा-या वर्गानेही ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून ती गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढवणारी ठरण्याची चिन्हे आहेत.
पाथर्डीत मुंडे यांची सभा व्हावी यासाठी गांधी पहिल्यापासून प्रयत्नशील होते, मात्र मुंडे यांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिलाच नाही. गांधी यांनी अखेर आमदार शिवाजी कर्डिले यांना मध्यस्थी घातले, त्या वेळी मुंडे यांनी सोमवारी सभा घेण्याचे मान्यही केले होते. त्यानुसार आज ही सभा होणार होती, प्रत्यक्षात सभा झालीच नाही. ती होणार नाही, याचा रविवारीच अंदाज आला होता. तरीही त्याबाबत उत्सुकता होती, अखेर सभा झालीच नाही. जाहीर प्रचाराचा उद्या (मंगळवार) शेवटचाच दिवस आहे. निदान उद्या तरी पाथर्डी येथे मुंडे यांची सभा व्हावी यासाठी गांधी अजूनही प्रयत्नशील आहेत. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्याला यश आले नव्हते. उद्या शेवटचाच दिवस असल्याने आता मुंडे यांची सभा होणार नाही असेच सांगण्यात येते. नरेंद्र मोदी यांची सभा नगरला सभा झाली याचा फायदा गांधी यांना होईल, मात्र पाथर्डी येथे मुंडे यांची सभा झाली नाही, तर त्याचा त्यांना तोटाही होण्याची शक्यता व्यक्त होते.