महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबर आज बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणेही उपस्थित राहणार आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. आगामी लोकसभा निवड़णुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांच्या कामकाजाचे मूल्यमापन आणि रणनिती ठरवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते.

नारायण राणे भाजपाच्या पाठिंब्याने राज्यसभेवर खासदार झाले. नारायण राणेंनी भाजपाला पाठिंबा दिला असला तरी मनाने पूर्णपणे भाजपासोबत असल्याचे दिसत नाही. नारायण राणे आणि अमित शाह यांची स्वतंत्र बैठक होईल अशी माहिती आहे. राणे आणि शाह यांच्यात नेमकी या बैठकीत काय चर्चा होईल त्याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपामध्ये सहभागी होतील. फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. पण भाजपाने त्यांना झुलवतच ठेवले. पक्षात प्रवेशही दिला नाही. त्यामुळे राणेंनी अखेर स्वतंत्र पक्ष काढून भाजपाला पाठिंबा दिला.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून थोरले सुपूत्र निलेश राणे यांना निवडून आणण्याचे राणेंसमोर आव्हान आहे. हा मतदारसंघ कधी राणेंचा बालेकिल्ला होता. पण २०१४ मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेने निवडणूक जिंकली. आता इथे शिवसेनेचेही वर्चस्व आहे. त्यामुळे मुलाच्या उमेदवारीचा राणेंसमोर प्रश्न आहे. मागच्या महिन्यात नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मुलाच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा होती.