पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण देश दु:खात आहे. भारताला छेडणाऱ्यांना याआधी सोडले नव्हते आणि भविष्यातही सोडले जाणार नाही. भारताला आपली शक्ती पुन्हा सिध्द करण्याची वेळ आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

येथील खान्देश गोशाळा मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते धुळे-नरडाणा या नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी आणि सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर जलवाहिनी या योजनांचे भूमिपूजन झाले. पंतप्रधानांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर प्रथम शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. मोदी यांनी खास अहिराणी भाषेत भाषणाला सुरूवात केली. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. एकीकडे देश संतापात तर दुसरीकडे दु:खात आहे. शहीद जवान आणि त्यांच्या मातेला आपण नमन करतो. जवानांनी देशाची नि:स्वार्थ सेवा केली. त्यांनी त्यांचे सर्वस्व त्यागले. एक नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकावर देश रक्षणाची मोठी जबाबदारी आहे. आता संयम ठेवू, पण शहिदांसाठी निघालेल्या देशवासीयांच्या अश्रूंचे पुरेपूर उत्तर दिले जाईल, असे मोदी यांनी सूचित केले.

प्रधानमंत्री सिंचन योजनेतून महाराष्ट्रात मोठे काम झाले आहे. राज्यातील दुष्काळ निवारणार्थ केंद्राने मोठा निधी दिला. या निधीतून पूर्ण होणाऱ्या योजनांमधून महाराष्ट्र सुजलाम होईल. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. पशुपालक शेतकऱ्यांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार दरवर्षी सहा हजार रुपये जमा करणार आहे. खान्देशात कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प होणार आहेत. औद्योगिक विकासाला चालना मिळू शकेल, अशा सुविधा येथे उपलब्ध होतील. यामुळे देशाच्या अनेक भागांशी धुळ्याचा संपर्क होईल. आज धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ होत असला तरी हा रेल्वे मार्ग भविष्यात मनमाड-इंदूर  मार्गाशी जोडला जाईल. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर मार्गावरील सर्व भागात पुरेसा रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाच्या सिंचन योजनांना चालना दिली गेल्याचे नमूद केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून सुलवाडे जामफळ योजना पूर्ण होईल. दुष्काळी तालुक्याला नवसंजीवनी मिळेल. धुळे-औरंगाबाद महामार्ग लवकरच पूर्ण होईल. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण खान्देशच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी धुळ्याची क्षमता ओळखली आहे. सात राष्ट्रीय महामार्ग आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा विकास होईल. १२० वर्षांपूर्वी पहिली धुळे-चाळीसगाव रेल्वे धावली होती. आता तिचा प्रवास वाढणार आहे. महापालिका हातात सोपविणाऱ्या धुळेकरांना सर्व सुविधा दिल्या जातील. मागील चार महिन्यात राज्य सरकारने विविध कामांसाठी सुमारे ५०० कोटींचा निधी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यावेळी रेल्वे मार्गाची माहिती दिली. नऊ  हजार कोटींच्या प्रकल्पासह अन्य विकास कामांबरोबर केंद्र-राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून प्रकल्प पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले.