राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका बसला होता. यामध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याची भरपाई म्हणून सरकारने आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले होते. यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी सरकारने जाहीर केला होता. मात्र ही घोषणा म्हणजे जुमलेबाजी असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई जाहीर करा अशी मागणी विरोधी पक्षाने वारंवार केली होती. त्यानंतर सरकारने नुकसान भरपाई देतो असे सांगून जीआर काढला. मात्र त्यात फक्त ११ कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे.

त्यामध्ये नाशिक जिल्हयात एक शेतकरी, वर्धा एक शेतकरी, हिंगोलीमध्ये सहा शेतकरी आणि काही जिल्हयात दहा शेतकरी यांना मदत करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र ही जुमलेबाजी आहे असे नवाब मलिक म्हणाले. हे भाजप सरकार ३८ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर करते परंतु १८ हजाराचेही वाटप होत नाही. नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर ते पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. दुष्काळ असताना सरकारकडून कोणतीही उपाययोजना होत नाही. म्हणजे हे सरकार जुमलेबाज आणि शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट होते असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.