शरद पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यातून त्यांनी पडळकरांच्या टीकेवर भाष्य केलं असून, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी संतापामध्ये मी कधी फडणवीस ‘महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग’ असं म्हणणार नाही असं वादग्रस्त वक्तव्यही केलं.

पडळकरांच्या टीकेवर बोलताना अनिल गोटे यांनी म्हटलं आहे की, “पडळकरांचा राजकारणातील अनुभव फारच तोकडा आहे. पडळकरांनी शरद पवारांना करोनाची उपमा दिली यावरुन त्यांची राजकीय पात्रता, मनाच क्षुद्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते. पवारांचे वय, अनुभव अन् राजकीय कारकिर्दीसमोर पडळकर डासाएवढेही नाहीत. डास मारायला कोणी बंदूक वापरणार नाही. एक हीटचा फवारा भरपूर असतो”.

पडळकरांना भाजपाच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच शुद्धीवर येतील असंही ते म्हणाले आहेत. “पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहे. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील त्यावेळेला बाजूला स्वत:ची सावलीसुद्धा उभी राहणार नाही. माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो आहे,” असं ते म्हणाले आहेत.

“मी अनेकदा शरद पवारांवर टीका केली. गेले १० महिने मी त्यांच्याबरोबर काम करत आहे. दिलेल्या शब्दाला जागणे, मनात द्वेष न बाळगणे ही त्यांची विशेषता. शरद पवारांवर प्रेम करणारांची संख्या जेवढी राष्ट्रवादीत आहे त्यापेक्षा दुप्पट लोक अन्य पक्षातील आहेत, जे त्यांच्यावर प्रेम करतात,” असंही ते म्हणाले आहेत.

अनिल गोटे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी केलेली धोकेबाजी, विश्वासघात जगजाहीर आहे. एकही धनगर विधानसभेत घेऊ नये यासाठी केलेली कारस्थानं, डावपेच आणि प्रसंगी विरोधकांना बळ देण्याचे उद्योग मी जाणून आहे. माझ्या मतदारसंघात तर मुसलमान आला तरी चालेल पण अनिल गोटे येता कामा नये यासाठी पैशाचा महापूर आला होता. पण संतापामध्ये मी कधीही फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी तसे मी कधी बोलणार नाही”.