सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर पाठवण्याचा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेचा पाठिंबा देत ‘कमळी’ची (भाजपा) चिंता तुम्ही करू नका, असा विश्वास दिला आणि विशेष म्हणजे सुप्रिया या बिनविरोध राज्यसभेवर गेल्या, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सांगितली.

‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही गोष्ट बाळासाहेबांना समजली. त्यांनी मला एक दिवस फोन केला आणि त्यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत ला प्रश्न विचारून सुप्रिया यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. भाजपाची चिंता करू नका, मी त्यांना सांभाळून घेईन, असे म्हटले. या निवडणुकीत सुप्रिया या बिनविरोध निवडून गेल्या.

त्यांनी मला अनेक नावे दिली होती. ते मला शरद बाबू म्हणत असत. जेव्हा मी अल्पसंख्याकाबद्दल बोलत तेव्हा ते मला म्हम्द्या म्हणत. मैद्याचं पोतं ही म्हणत. पण त्यांनी मैत्री जागवली. पवार यांनी यावेळी त्यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.