राज्यात भयंकर दुष्काळ असतानाही केवळ शब्दांचे खेळ करत दुष्काळसदृश परीस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पण या घोषणेने मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

अपुऱ्या पावसामुळे निम्म्या राज्यावर भीषण दुष्काळाची छाया पसरली असून राज्याच्या तब्बल १८० तालुक्यांतील सुमारे २० हजार गावांत सरकारने मंगळवारी टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.
‘राज्यात भयंकर दुष्काळ असतानानाही केवळ शब्दांचे खेळ करीत दुष्काळसदृश परीस्थिती जाहीर करुन मुख्यमंत्र्यांनी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ या म्हणीची आठवण करुन दिली’, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सोमवारी पुण्यात अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान, राज्यात यंदा सरासरीच्या ७५.८ टक्के पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद सोलापूर तर सर्वाधिक पावसाची नोंद सातारा जिल्ह्यात झाली आहे. सोलापूर,नाशिक, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्य़ांत ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याने १७३ तालुक्यांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. या जिल्ह्यांमधील जवळपास सर्वच तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती असल्याने जनतेला दिलासा देण्यासाठी या तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाची वीज खंडित न करणे आदी विविध आठ सवलती लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.