|| हर्षद कशाळकर

रायगड लोकसभा मतदारसंघात चुरस

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन रॅलीला गुरुवारपासून रायगड जिल्ह्य़ातून सुरुवात झाली. यासाठी राष्ट्रवादीचे बहुतांश नेते महाड येथे दाखल झाले होते. भाजप सरकारच्या ध्येयधोरणांवर सर्वच नेत्यांनी तोंडसुख घेतले. आगामी निवडणुकीत उलथून टाकण्याचे आवाहन केले, आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळही फोडला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत सुनील तटकरे यांचा रायगडमधून पराभव झाला होता. शेवटच्या मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत तटकरे यांनी शिवसेनेच्या अनंत गीते यांना झुंजवले होते. हा पराभव तटकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. निवडणुकीत नामसाधम्र्य असलेल्या एका उमेदवाराने तटकरे यांची दहा हजार मते खाल्ली होती. तसेच अंतुले समर्थक एका मुस्लीम उमेदवारानेही मोठी मते घेतली होती. तटकरे यांच्यासाठी या दोन्ही गोष्टी अडचणीच्या ठरल्या आणि हातातोंडाशी आलेला विजय निसटला.

आता मात्र पुन्हा एकदा रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तटकरे सज्ज झाले आहेत. पक्षाच्या वतीने याबाबत अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनेचे अनंत गीते अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. जिल्ह्य़ात गेल्या पाच वर्षांत राष्टवादीची मोठी वाताहत झाली आहे. दुसऱ्या फळीतील अनेक ज्येष्ठ नेते पक्ष सोडून शिवसेनेत गेले आहेत. तटकरे यांच्यासाठी ही एक अडचणीची गोष्ट असणार आहे. काँग्रेसमध्येही तटकरे यांच्या कार्यप्रणालीबाबत कमालीची नाराजी आहे. अलिबागमधून काँग्रेसच्या मधुकर ठाकूर आणि पेणमधून रविशेठ पाटील यांची मनधरणी करणे हे तटकरेसमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. भास्कर जाधव यांची नाराजी दूर करणेही तटकरे यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

शेकापची भक्कम साथ यावेळी तटकरेंच्या सोबत असेल. तटकरेंसाठी सर्वात दिलासा दायक बाब असेल. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शेकापची संघटनात्मक बैठक चांगली आहे. आजवरच्या निवडणूकांचा इतिहास लक्षात घेतला तर शेकापची मते सहसा फुटत नसल्याचे नेहमीच दिसून आले आहे. त्यामुळे तटकरे यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. अनंत गीते सलग दोन वेळा रायगड लोकसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. खासदार निधीचा शंभर टक्के विनीयोग सोडला. तर त्यांनी मतदारसंघात लक्ष्यवेधी काम केलेली नाही. त्यामुळे याच वर्मावर बोट ठेऊन तटकरे यांनी आता गीते यांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे.

विधानपरीषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर तटकरे यांना सात महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. या कालवधी त्यांनी मतदारसंघ बांधणीसाठी वापरण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक तालुक्यात बैठका घेणे आणि जुन्या कार्यकर्त्यांंना पुन्हा पक्षात जोडणे अशा दोन पातळ्यांवर ते सध्या काम करत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांना पुन्हापक्षात घेऊन त्यांनी याची सुरवात केली आहे. देसाई यांची घरवापसी सेनेसाठी अडचणीची आहे.

निवडणूकीच्या तोंडावर पक्षाची होणारी वाताहत गीतेंसाठी अडचणीची आहे. अशातच जर सेना भाजप युती झाली नाही. तर गीते यांच्या अडचणीत अधिकच भर पडण्याची शक्यता आहे. मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसली तरी, मतविभाजनाचा फटका गीते यांना बसणार आहे. त्यामुळे सेना भाजपची युती न होणे हे तटकरे यांच्या पथ्यावर पडणार आहे.

अनंत गीते यांनी निवडणूक तयारीला अद्यप सुरुवात केली नसली तरी दुसऱ्या बाजूला तटकरे मात्र निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन मोहिमेची सुरुवात रायगडमधून करून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळही फोडून घेतला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या महाडमध्ये ही रॅली घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शनही केले आणि गीतेंना सूचक इशाराही दिला.