पक्ष निरीक्षक आ. दिलीप वळसे व अंकुश काकडे यांची माहिती

नगर : महापालिकेत महापौरपदासाठी भाजपला दिलेल्या पाठिंब्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीपूर्वी, दि. २४ डिसेंबरपूर्वी निर्णय घेईल, असे  राष्ट्रवादीचे निरीक्षक आ. दिलीप वळसे व अंकुश काकडे यांनी आज, सोमवारी जाहीर केले. राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगरमध्येही सुधारणा करुन निर्णय घेतला जाणार असल्याचे तसेच जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी केली जाईल, मात्र अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असेही दोघांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले, पक्षाचे सहा आमदार विजयी झाले, राष्ट्रवादी व मित्रपक्षांना मिळून एकूण १२ पैकी ९ जागा मिळाल्या. त्यानिमित्ताने पक्ष कार्यालयात आज, राष्ट्रवादीच्या आमदारांचा आ. वळसे व काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सत्कार समारंभाला आ. रोहित पवार अनुपस्थित राहिले, त्याकडे लक्ष वेधले असता आ. पवार कौटुंबिक कारणाने पूर्वपरवानगी घेऊन अनुपस्थित असल्याचे आ. वळसे यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर, पूर्वी एकमेकांच्या विरोधात स्थानिक पातळीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यायची याविषयी विचारणा केली असता आ. वळसे म्हणाले, तिन्ही पक्षांनी मिळून ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमानुसार प्रत्येक पक्ष त्याबाबत स्थानिक पातळवर त्याबाबत सुचना करेल. त्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय करुन निर्णय घेतला जाईल.

पक्षाचे नेते आ. अजित पवार पक्ष किंवा सरकारपासून अलिप्त नाहीत, पक्षात ते सक्रिय आहेत, अधिवेशनापूर्वी खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तार होईल तसेच येत्या महिनाभरात सरकार स्थिरस्थावर झालेले दिसेल, उपमुख्यमंत्री पदावरुन सरकारमध्ये कोणताही पेच नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तरी कोणाची हरकत नाही, असेही आ. वळसे यांनी यासंदर्भातील प्रश्नावर स्पष्ट केले.

भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राज्यात राष्ट्रवादीसह तीन पक्ष एकत्र आले, नगर शहरात मात्र महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता, आ. वळसे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील या निर्णयाला पक्षाचा पाठिंबा नाही, त्या नगरसेवकांवर कारवाई झालेली आहे. मात्र अद्याप पक्षाने भाजपचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केलेले नाही, याकडे लक्ष वेधले असता, आ. वळसे यांनी हा विषय पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्याकडे टोलवला. काकडे म्हणाले की, हा प्रश्न केवळ एकटय़ा नगरचा नाही, राज्यात इतर ठिकाणीही हा प्रश्न आहे.

सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर याबाबत सुधारणा करुन निर्णय घेतला जाईल, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या पोटनिवडणुकीसाठीही भाजप व राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, याकडे लक्ष वेधले असता काकडे यांनी तोपर्यंत राष्ट्रवादी निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.

गटनेते अद्यापि कायम!

जिल्ह्य़ात स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांनी, विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या चित्राने, विखे गटापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आहे, अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत भाजपशी समन्वय होऊ शकतो का, या प्रश्नावर आ. वळसे यांनी नकारार्थी उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीनंतर बदलत्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे गटनेते अद्याप बदलले गेले नाहीत, याबद्दल पक्षनिरीक्षक आ. वळसे व काकडे यांनी आश्चर्य व्यक्त केले.