News Flash

राष्ट्रवादीचे वैभव पिचड भाजपच्या वाटेवर

प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी याबाबत प्राथमिक चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली होती

(संग्रहित छायाचित्र)

अकोले : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तालुक्याच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांंच्या बैठकीत सांगितले .उद्या मतदार संघातील कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यात यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे .दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांकडे शुक्रवारी पाठविले .

गेल्या काही दिवसांपासून आमदार पिचड पक्ष सोडणार असल्याची तालुक्यात चर्चा होती .तालुक्यातील आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी याबाबत प्राथमिक चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली होती. काल नगर येथे झालेल्या पक्षाच्या मुलाखतीकडे त्यांनी पाठ फिरवली. तसेच पक्षाचा तालुक्यातील एकही प्रमुख कार्यकर्ता तिकडे फिरकला नाही तेव्हाच त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट झाली होती. युतीच्या जागा वाटपात अकोले मतदार संघ शिवसेनेकडे आहे .त्यामुळे ते शिवसेनेत जाणार की भाजपचा पर्याय स्वीकारणार  याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता .

आठवडाभरात काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. चंद्रकांत पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे या वेळी उपस्थित होते .याच भेटीत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले .

आज त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांंची बैठक झाली .माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशा आशयाच्या भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या .

गेल्या पाच वर्षांत विकासाच्या बाबतीत अकोल्याची कोंडी झाली होती. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कार्यकर्ते, लोक तसे बोलून दाखवितात,त्यांच्या व्यथा मांडतात याचा उल्लेख करीत आमदार पिचड यांनी तालुक्याच्या विकासासाठी हृदयावर दगड ठेवून तत्त्व बाजूला सारत हा निर्णय घेत असल्याचे बैठकीत सांगितले .

उद्या तालुक्यातील कार्यकर्त्यांंचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे .त्यात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येतील. त्यानंतर या बाबतचा अधिकृत निर्णय घोषित होईल.

समर्थक, विरोधक बुचकळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार प्रथम आमदार पिचड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पुढील चार पाच दिवसात पक्ष प्रवेश करतील. पुढील महिन्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येत आहे .त्यावेळी कार्यकर्त्यांंचा पक्ष प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे .  लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात फक्त अकोले तालुक्यात काँग्रेस आघाडी उमेदवाराला ३१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. शिवाय तालुक्यातही आ. पिचड यांच्या पुढे मोठे राजकीय आव्हानही नव्हते. असे असताना त्यांनी पक्ष सोडण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे अनेक समर्थक तसेच विरोधक बुचकळ्यात पडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 2:55 am

Web Title: ncp vaibhav pichad likely to join bjp zws 70
Next Stories
1 चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम; कमळ हाती घेण्याची शक्यता
2 राज्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ट्रस्टची स्थापना होणार
3 सत्तेत आल्यास भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण: अजित पवार
Just Now!
X