भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांना करोनासंदर्भातील बैठकीमधील साधा प्रोटोकॉलही समजत नाही का अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटवरुन केली आहे. निलेश राणे यांनी टीका करताना ट्विटवरुन करोनासंदर्भातील बैठकीतील एक फोटो शेअर करत आदित्य ठाकरे हे मोबाइमध्ये व्यस्त असल्याचे म्हटले आहे.
काय आहे फोटोमध्ये
निलेश राणे यांनी शनिवारी (१६ मे २०२०) रोजी ट्विटवरटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबरोबर महाविकास आघाडीतील काही अन्य नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये आदित्य ठाकरेही दिसत असून ते मोबाइलमध्ये बघताना दिसत आहेत. संबंधित बैठक ही शुक्रवारी पार पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या (डीजीआयपीआर) ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास महाडीजीआयपीआर या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोला, “लॉकडाउनची सध्याची परिस्थिती, त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन आणि राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथील एका बैठकीत घेतला आढावा. केंद्र शासन लॉकडाऊनचा चौथा टप्पा कशा स्वरूपात ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार,” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
#Lockdown ची सध्याची परिस्थिती, त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन आणि राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथील एका बैठकीत घेतला आढावा. केंद्र शासन #लॉकडाऊन चा चौथा टप्पा कशा स्वरूपात ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार. pic.twitter.com/4f43O9TqQ2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 15, 2020
निलेश राणेंची टीका
हाच फोटो ट्विट करत निलेश राणे यांनी या बैठकीदरम्यान आदित्य ठाकरे मोबाइलवर व्यस्त असल्यावरुन टोला लगालावला आहे. “कोरोना संदर्भात मीटिंग चालू असताना कोपऱ्यात एका बाजूला आदित्य ठाकरे मोबाईलमध्ये व्यस्त आहे, याला कोणी प्रोटोकॉल काय असतो तो सांगा. कोणत्याही गोष्टीच गांभीर्य नाही शेवटी बालिश बुद्धी आहे हे परत सिद्ध करून दाखवलं,” अशी कॅप्शन देत राणे यांनी हा फोटो ट्विट केला आहे.
कोरोना संदर्भात मीटिंग चालू असताना कोपऱ्यात एका बाजूला आदित्य ठाकरे मोबाईल मध्ये व्यस्त आहे, याला कोणी protocol काय असतो तो सांगा. कोणत्याही गोष्टीच गांभिर्य नाही शेवटी बालिश बुद्धी आहे हे परत सिद्ध करून दाखवल. pic.twitter.com/KZJ1TUEbeW
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
राणे यांच्या फोटोवर काही तासांमध्ये प्रतिक्रिया असून अनेकांनी यावरुन आदित्य यांच्यावर टीका केल्याचे दिसत आहे. १३५ जणांनी हा फोटो रिट्विट केला आहे.