चंद्रपूर जिल्ह्यात आज 9 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आता पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 12 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आज आढळलेल्या या नऊ रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापैकी पाच जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर चार जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक अलगीकरणात आहेत. वन अकादमीमध्ये 19 मे रोजी संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले चार जण नाशिक मालेगाव एमआयडीसीमध्ये काम करत होते.  भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने हे चार जण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांना वन अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते. हे चारजण चिरोली ( मूल ), जाम (पोंभुर्णा ), विसापूर ( चंद्रपूर ) व विरवा (सिंदेवाही ) या परिसरातील आहेत.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यात आज 54 नव्या करोनाबाधितांची नोंद

पुणे येथून आलेले पती-पत्नी वरोरा येथे यापूर्वी संस्थात्मक अलगीकरणात होते. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात ते उपचार घेत आहेत. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी परिसरातील एक 20 वर्षीय मुलगी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील आरवट येथील एक युवक ठाण्यावरून परत आला असून  वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.  तसेच, ब्रह्मपुरी तालुक्यातील 21 वर्षीय युवक दिल्लीवरून परत आला व तो देखील सध्या वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहे. हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) आहेत. १९ मे रोजी त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. सर्व नागरिक बाहेरून आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.