17 January 2021

News Flash

पाकला माहिती समाजमाध्यमावरून!

काही महिन्यांपूर्वी बीएसएफचा एक जवान अशाचप्रकारे हनी ट्रॅपमध्ये पाकिस्तानच्या जाळयात अडकला होता.

निशांत अग्रवाल

ब्रह्मोसबाबत निशांत अग्रवालच्या चौकशीत धक्कादायक बाब उघड

मंगेश राऊत, नागपूर

दोन तरुणींच्या बनावट फेसबूक अकाऊंटच्या माध्यमातून निशांत अग्रवाल याला अडकवण्यात आले व त्यानंतर त्याने ‘लिंक्डइन’ या संकेतस्थळावरून ‘चॅटिंग’ करताना पाकिस्तानला ब्रह्मोस मिसाईलचे कोडिंग दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी निशांतला येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एम. जोशी यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. एटीएसच्या विनंतीवरून न्यायालयाने त्याला लखनऊ येथे घेऊन जाण्यासाठी १२ ऑक्टोबपर्यंत ट्रांझिट रिमांड मंजूर केला.

मूळचा रुरकी येथील निशांत अग्रवाल हा चार वर्षांपूर्वी संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) नागपूर अंतर्गत बह्मोस मिसाईल तयार करणाऱ्या ब्रह्मोस एअरोस्पेश कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाला. त्याच्या कामाची दखल घेऊन जानेवारी २०१७ मध्ये त्याला वरिष्ठ सिस्टीम अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. सप्टेंबर २०१८ मध्ये तरुण वैज्ञानिक पुरस्काराने गौरवण्यात आले. यादरम्यान नेहा शर्मा व पूजा रंजन या नावांनी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथून दोन बनावट फेसबूक खाते उघडण्यात आले. त्या खात्यांवरून भारतातील अती संवेदनशील व संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे (सुपरसोनिक डिफेंस कंपनी) अधिकारी व वैज्ञानिकांना ‘फ्रेंन्ड रिक्वेस्ट’ पाठवण्यात आली. अनेक वैज्ञानिक व अधिकाऱ्यांनी त्या नाकारल्या. मात्र, निशांतने त्यांची कोणतीही पडताळणी न करता स्वीकारल्या. त्यानंतर त्यावरून ऑनलाईन चॅटिंग करू लागला. त्यांना व्यक्तिगत माहिती दिली. त्यानंतर  ‘लिंक्डइन’ या संकेतस्थळावरून त्यांच्याशी संवाद सुरू झाला.  त्यादरम्यान त्याने अतिशय गुप्त अशी डीआरडीओ व ब्रह्मोसची माहिती त्यांना दिली. त्यात ब्रह्मोसचे कोडिंगही आहे. हा प्रकार अतिशय धोकादायक असून देशविघातक आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी उत्तरप्रदेश एटीएसने निशांतची पोलीस कोठडी हवी आहे.

त्याकरिता त्याला लखनऊ येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असून तेथपर्यंत घेऊन जाण्यासाठी १२ ऑक्टोबपर्यंत ट्राझिंग रिमांड देण्याची विनंती केली. ही विनंती न्यायालयाने मंजूर केली. एटीएसतर्फे अ‍ॅड. एस. जे. बागडे यांनी बाजू मांडली. तर लखनऊ एटीएसचे पोलीस निरीक्षक अवस्थी यांनी वरील माहिती न्यायालयाला दिली.

समाजमाध्यमांवर स्वत:ची ओळख उघड

काही महिन्यांपूर्वी बीएसएफचा एक जवान अशाचप्रकारे हनी ट्रॅपमध्ये पाकिस्तानच्या जाळयात अडकला होता. तेव्हापासून देशातील अतिसंवेदनशील संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी व वैज्ञानिकांवर लक्ष ठेवले जात होते. त्यावेळी निशांत हा ब्रम्होस मिसाईलसाठी काम करीत असून त्याने स्वत:ची ओळख  फेसबूक व लिंकडिनसारख्या संकेतस्थळावर जाहीर केली. त्यामुळे पाकिस्तान व अमेरिकेसारख्या देशांनी त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवले. ऑफिसियल सिक्रेट अ‍ॅक्टच्या कलम ३, ४, ५, ९, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६-ब आणि भारतीय दंड संहितेचे कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, १२०-ब आणि १२१-अ अंतर्गत अतिसंवेदनशील संस्थेची माहिती उघड करणे, विदेशी हेरगिरीसाठी माहितीचे आदानप्रदान करणे व कट रचून देशाची सुरक्षा धोक्यात टाकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही एटीएसच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.

लॅपटॉपमध्ये अतिसंवेदनशील दस्तावेज

संरक्षण क्षेत्रातील सुपरसोनिक कंपन्यांमध्ये काम करताना वैज्ञानिक, अभियंते आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे दस्तावेज संस्थेच्या बाहेर घेऊन जाता येत नाही. मात्र, निशांतने ब्रम्होसचे कोडिंगसह इतर अनेक दस्तावेज पीडीएफ स्वरुपात स्वत:च्या लॅपटॉपमध्ये बाहेर घेऊन गेला. त्यापैकी अनेक अतिसंवेदनशील आहेत. बनावट फेसबूक अकाऊंटशी चॅटिंग करताना पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेने एक लिंक पाठवून निशांतचा संपूर्ण लॅपटॉप आपल्या ताब्यात घेऊन ही माहिती आपल्याकडे घेतल्याचा संशय अवस्थी यांनी न्यायालयात दिली.

मुलगा निर्दोष – पित्याचा दावा

आपला मुलगा निर्दोष आहे. मात्र, त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्हा सिद्ध झाल्यास भविष्यात आपणही ते स्वीकारू. पण, तोपर्यंत त्याच्या बचावासाठी आपण कायदेशीर लढा देऊ, अशी प्रतिक्रिया त्याचे वडील प्रदीप अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

एनआयटी रुरकीतून शिक्षण

निशांत हा उच्चशिक्षित कुटुंबातील आहे. त्याने कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून  (एनआयटी) २०१४ मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी रुरकी येथील संशोधक म्हणूनही काम केले. त्याने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्येही नोकरी केली. त्यानंतर २०१४ पासून तो ब्रम्होस एरओस्पेश अंतर्गत नागपुरात कार्यरत असून वर्धा मार्गावरील उज्वलनगर येथे मनोहर काळे यांच्या घरी भाडय़ात राहात होता. ३१ मार्च २०१८ मध्ये क्षितिजा हिच्याशी तो विवाहबद्ध झाला. त्याला आईवडील व एक बहिण आहे.

निशांत अग्रवाल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 2:19 am

Web Title: nishant agarwal supply brahmos information through social media
Next Stories
1 नागपूर केंद्रातून सुखोईला ब्रह्मोसचे बळ
2 नागपूरच्या डॉ. रिचा मेहता ‘मिसेस इंडिया यूनिव्हर्स’
3 अमली पदार्थविरोधी कारवाईत नागपूर दुसऱ्या स्थानावर
Just Now!
X