प्रबोध देशपांडे, अकोला

नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणारे नितीन गडकरी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अ‍ॅड. आंबेडकरांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी युती व आघाडीच्या भूमिकेवर चौफेर टीकास्त्र सोडले. नितीन गडकरींचा पराभव अटळ असल्याचा दावा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आदिवासी, हलबा, मुस्लीम, बौद्ध आदी भाजपच्या विरोधात आहेत. आदिवासींवर अन्याय झाला. त्यामुळे नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

वाचा: काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘बी टीम’

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून वंचित बहुजन आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या असल्याची टीका केली. या टीकेवरही प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेला आतापर्यंत भाजपा पसंत नव्हती. तरी पण शिवसेनेने भाजपासोबत लग्न का केले, याचा खुलासा प्रथम उद्धव ठाकरेंनी करावा, असे त्यांनी सांगितले.