रायगड जिल्ह्यतील करोनाबाधितांचा आकडा ३२वर पोहोचला आहे. यात पनवेल महानगर पालिका हद्दीतील २६ तर उलवे परिसरातील ४  तर उरणमधील २ जणांचा समावेश आहे. यातील तिघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. चार जण करोनामधून पूर्ण बरे झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यतील ३४७ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील ३२ जणांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले. यात केंद्रीय सुरक्षा बलातील ११ तर १५ अन्य व्यक्तींचा तसेच पनवेल ग्रामीण आणि उरणमधील एकूण ६ जणांचा समावेश आहे. या सर्वावर पनवेल, नवीमुंबई आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी पनवेल महानगर पालिका हद्दीत आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आले.  खारघर येथील ओला टॅक्सी चालकाच्या संपर्कातील दोघांना तर घोट गावातील एकाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. अलिबागमधील दोघांचे, पेणमधील एकाचा तर उरणमधील पाच जणांचे अहवाल नकारात्मक आले. जिल्ह्यतील २२ जणांचे अहवाल सध्या प्रलंबित आहेत. उरणमधील आनंदी निवास, राघोबा देवमंदीर, मच्छीमार्केट शिवप्रेरणा इमारत, जेएनपीटी टाऊनशिपमधील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.