कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्दय़ावरून विधान परिषदेत गुरुवारी विरोधक कमालीचे आक्रमक झाले. गदारोळ झाल्याने तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

विरोधी पक्षाच्या एका सदस्याच्या उद्गारावरून सत्ताधारी भाजप-सेनेचे आमदारही आक्रमक झाले. त्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणा देऊ लागले. अखेर सभापती रामराजे निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत नियम ९७ अन्वये रामहरी रुपनवर, रामराव वडकुते आणि अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ावर बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, धनगर आरक्षणाबाबतचा ‘टीस’चा अहवाल सभागृहापुढे न मांडता महाधिवक्त्यांकडे सुपूर्द करण्यात आला यावरूनच सरकार या विषयावर गंभीर नसल्याचे स्पष्ट होते.

यावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ‘धनगर वा मराठा समाज ही कोणाच्या बापाची जहागीर नाही’ असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी भाजप- सेनेचे आमदार आक्रमक झाले. जगताप सदनाची माफी मागणार नाहीत तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही, असे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितले.

यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, भाई गिरकर यांच्यासह अनेक आमदारांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी धनगर आरक्षणावरून घोषणा देत गदारोळ केल्यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले होते. त्यातच सत्ताधारी पक्षानेही कामकाज रोखून धरण्याची भूमिका घेतल्याने सभापती रामराजे निंबाळकर यांनी भाई जगताप यांचे वक्तव्य तपासून पाहू, असे सांगत कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.