करोनाच्या काळात टाळेबंदीने मेटाकुटीला आलेल्या उत्पादकांच्या चिंतेत भर

पालघर : पालघर जिल्ह्यतील विक्रमगड तालुक्यामध्ये आदिवासी शेतकरी व मोगरा उत्पादक मोगरा उत्पादनातून स्वत:चा विकास साधण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक अनेकविध कारणांमुळे मोगऱ्याला उतरती कळा लागली आहे. सध्या रोगाच्या प्रादुर्भावाने मोगऱ्याच्या पिकावर परिणाम झाला असून त्यामुळे मोगरा उत्पादक, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची विविध साधने नसताना या शेतकऱ्यांनी मोगरा उत्पादनातून सबलीकरण करण्याचा ध्यास घेतला होता. गेल्यावर्षी या मोगरा उत्पादनातून त्यांना चांगलेच आर्थिक उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर मोगरा शेतीकडे मोठय़ा आशेने शेतकरी पाहू लागले व एकमेकांना प्रोत्साहित करत मोठय़ा प्रमाणात मोगरा लागवडीचे क्षेत्र विस्तारत गेले. ऐन मोगरा बहरण्याच्या हंगामातच करोनासदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे फुलांच्या बाजारपेठा बंद पडल्या व मोगऱ्याला उतरती कळा सुरू झाली. पंधराशे ते दोन हजार रुपये प्रतिकिलोने विकणारा मोगरा टाळेबंदी दरम्यान गडगडू लागला. मोगऱ्याचे दर त्यावेळी कमी झाल्याने शेतकऱ्यांना तितका फायदा झाला नसला तरी उत्पादित केलेला मोगरा विकला जात होता.

विक्रमगड तालुक्यातील विविध गावांमध्ये सुमारे सातशे शेतकरी मोगरा फुलाची शेती करताहेत. भरघोस आर्थिक उत्पन्न मिळाल्यामुळे एकमेकांना प्रोत्साहित होऊन ही शेती त्यांनी त्या वेळी केली असली तरी बाजारभाव घडल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली. अलीकडेच करोना काळातून जनजीवन पूर्वपदावर येत असताना मोगऱ्याला चांगला भाव मिळणार, अशा आशा पल्लवित झालेल्या असतानाच मोगऱ्यावर आलेल्या अळीसदृश रोगामुळे मोगरा उत्पादकांना पार झोपवून टाकले आहे. या अळी प्रादुर्भावामुळे मोगऱ्याची कळी उमलत नसल्याने मोगरा उत्पादकांचे मोठे नुकसान होत चालले आहे. कृषी विभागामार्फत फवारणीसाठी विविध उपाययोजना या शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या मोगऱ्यावर प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे हे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मोगरा फुलला च्या हंगामातच असा प्रादुर्भाव होत असल्याने हातचे मोगऱ्याचे पीक वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात असून या पिकावर अवलंबून असलेले मजूरवर्गही संकटात सापडणार आहेत. त्यामुळे शेतकरी मोगरा सोडून इतर पिकांचा विचार करताना पाहावयास मिळत आहे.

कृषी विभागाने पुढाकार घेऊन मोगरा उत्पादकांच्या या अडचणींवर मात करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने अळींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे. नुकसान झालेल्या मोगऱ्याच्या फुलांचे पंचनामे करून मदतही मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

उपाययोजना शक्य

लेमीडोसहायलोथ्रीन हे कीटकनाशक दहा लिटर पाण्यात पाच मिली इतक्या प्रमाणात मिसळून त्याची फवारणी करावी. तसेच नीमतेल दहा लिटर पाण्यात ३० मिली इतके प्रमाण करून त्याचीही फवारणी केल्यास अळींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.याखेरीज प्रकाश सापळेही यावर उत्तम उपाय आहे. एका एकरमध्ये एक सापळा या प्रमाणे हे सापळे रचल्यास प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असे कोसबाड कृषी संशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी म्हटले आहे.