देशभरात करोना रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी अपुऱ्या ऑक्सिजनमुळे रुग्ण दगावल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या घडीला ऑक्सिजन ही अत्यंत मौल्यवान बाब झालेली असताना साताऱ्यामध्ये शेकडो लिटर ऑक्सिजनची नासाडी झाल्याची बाब समोर आली आहे. ऑक्सिजन टँकरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऑक्सिजन भरल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पुण्याहून कोल्हापूरला हा ऑक्सिजनचा टँकर जात असताना साताऱ्याजवळ महामार्गावर हा प्रकार घडला. ऑक्सिजन गळती होत असल्याचं लक्षात येताच ड्रायव्हरने पोलिसांना पाचारण केलं. त्यानंतर संबंधिच तांत्रज्ञ जागेवर पोहोचेपर्यंत शेकडो लिटर ऑक्सिजन वाया गेला होता.

नेमकं घडलं काय?

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ऑक्सिजन टँकरला सातारा शहरानजीक गळती लागली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊ लागल्यानंतर ड्रायव्हरला गळती होत असल्याचं लक्षात आलं. तातडीने संबंधित तंत्रज्ञांना बोलावून ऑक्सिजनची गळती रोखण्यात आली.

“मागणी वाढतेय, राज्याला २०० मेट्रिक टन जादा ऑक्सिजन द्या”, महाराष्ट्राचं केंद्र सरकारला पत्र!

देशाप्रमाणेच महाराष्ट्रात देखील ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती उद्भवली असून राज्य सरकारने नुकतीच केंद्र सरकारकडे अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. राज्यातल्या एकूण १६ जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशांनुसार राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. “महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. त्यासोबतच, लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० आयएसओ टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत”, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.