‘बनी तो बनी, नही तो परभणी’ या बहुचर्चित म्हणीचा अर्थच ‘कुठे  जमले तर ठीक नसता आपली परभणी आहेच’ असा होतो. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत अकोल्याचे विप्लव बाजोरिया येतात आणि वयाच्या एकतिसाव्या वर्षी परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार होतात हेच या म्हणीचे जिवंत उदाहरण मानले पाहिजे. घोडेबाजार आणि पशाचा पाऊस हेच विधान परिषद निवडणुकीचे अभिन्न वैशिष्टय़ असते हे खरे असले तरीही आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पराभवाला आखडता ‘हात’ आणि अवसानघात कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सुरुवातीपासूनच चच्रेत राहिली. बीडची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याच्या तहात परभणीच्या जागेवर पक्षाने पाणी सोडले. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा या खेळात नाहक बळी गेला. राष्ट्रवादीची जागा काँग्रेसकडे हस्तांतरित झाल्यानंतर सुरेश देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत उमेदवार ‘मालदार’ असावा लागतो. या निकषावर आघाडीच्या स्थानिक नेत्यांसह निवडणुकीतल्या मतदारांनाही त्यांची उमेदवारी प्रभावी वाटली होती. एकीकडे आघाडीत जागा जशी काँग्रेसकडे हस्तांतरित झाली तशीच ती जागा वाटपात शिवसेनेने भाजपकडून घेतली. शिवसेनेच्या वतीने थेट अकोल्याहून विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली. अकोल्याचे विधान परिषदेचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे विप्लव हे चिरंजीव. नगरसेवकांना थेट ‘चारचाकी’ मिळणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. बाजोरिया यांच्या तोडीसतोड उमेदवार आपल्याकडे आहे असा विश्वास आघाडीचे नेते बोलून दाखवू लागले. परभणीच्याच कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘कोण कुठला बाजोरिया’ या शब्दात शरसंधान केले होते.

मतदानाला दोन दिवस बाकी असताना आघाडीचे उमेदवार देशमुख यांनी ‘हात’ वर केल्याची चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी, आ. मधुसूदन केंद्रे, आ. विजय भांबळे या सर्वाचीच पंचाईत झाली. ज्यांचा उमेदवारी अर्ज िरगणात राहिला होता त्या सुरेश नागरे यांना ऐन वेळी उमेदवार म्हणून तयार करण्यासाठी या सर्वच नेत्यांनी धावपळ केली. सुरुवातीला तयार झालेल्या नागरे यांनी पुन्हा नकार दिला आणि आघाडीच्या या सर्व नेत्यांना  देशमुख यांच्याच पाठीशी राहावे लागले. शिवसेनेच्या बाजोरिया यांना देशमुख यांनी जोरदार लढत दिली, असे मतांचे आकडे सांगत असले तरीही हे सारे श्रेय आघाडीच्या नेत्यांकडेच जाते. बाजोरिया हे जिल्ह्याबाहेरचे उमेदवार आहेत असाही प्रचार झाला. तथापि या निवडणुकीत पक्षनिष्ठा किंवा स्थानिक, बाहेरचे असा वाद गरलागूच ठरेल आणि पसाच केंद्रिबदू ठरेल अशी परिस्थिती होती. नवनिर्वाचित आ. विप्लव यांचे वडील आ. गोपीकिशन बाजोरिया निकालानंतर म्हणाले, ‘मतदारांना आमची कामाची पद्धत आवडली.’ त्यांचे हे वक्तव्य पुरेसे सुचक होते.

देशमुखांच्या पराभवानंतर प्रश्न उपस्थित

या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची संख्या २९७ एवढी असताना काँग्रेसच्या उमेदवाराला २२१ मते मिळाली. बाजोरिया यांच्या विरोधात लढताना धनशक्तीचे अस्त्र देशमुख काढतील अशी आघाडीच्या नेत्यांची अपेक्षा होती. ती तर व्यर्थ ठरलीच मात्र आता राष्ट्रवादीच्या गोटातून देशमुख यांना आता काही प्रश्न विचारले जात आहे. राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनद यांनी देशमुख यांना लिहिलेले खुले पत्र निकालानंतर समाज माध्यमात सर्वत्र पसरले. या निवडणुकीसाठी आपण काय नियोजन केले? काय रणनीती आखली? आपल्या नाकत्रेपणाने हक्काची जागा गेली. आपल्याला लढायचेच नव्हते तर आपण उमेदवारी का मागितली? असे अनेक प्रश्न या पत्रात उपस्थित करण्यात आले आहे. बाजोरिया यांच्या विजयापेक्षा देशमुख यांचा पराभव हा असे अनेक प्रश्न जन्माला घालणारा ठरला आहे.

कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय -खा. संजय जाधव

बाजोरिया बाहेरचे आहेत असा त्यांच्यावर नाहक आरोप झाला. ते बाहेरचे असले तरी आम्ही इथले आहोत. शिवसेनेची तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळेच बाजोरिया यांचा विजय झाला. कार्यकर्त्यांची एकजूट कामाला आली. शिवसेनेने यापूर्वी ही जागा कधीही लढली नव्हती. आम्ही पहिल्यांदाच विधान परिषद निवडणूक लढलो आणि जिंकलोही. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हेच यानिमित्ताने सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया खा. संजय जाधव यांनी दिली.

काँगेसची मते फुटली- बाबाजानी

राष्ट्रवादीने प्रामाणिकपणे देशमुख यांचे काम केले. त्यांना जी मते मिळाली त्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे. जी मते फुटली ती काँग्रेसची असून सेलू, सोनपेठ, गंगाखेड या ठिकाणी देशमुखांना स्वपक्षीयांनीच झटका दिला आहे. उमेदवार म्हणूनही त्यांना नाकत्रेपणा भोवला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani hingoli legislative council election 2018 shiv sena viplav bajoria won against congress ncp
First published on: 24-05-2018 at 09:52 IST