News Flash

 ‘एसटी बंद’मुळे खासगी वाहतूकदारांची दिवाळी

विविध पक्ष संघटनांसह सर्वच स्तरातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला.

एसटी बंद आंदोलन सुरू झाल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांची आणि शासनाचीही कोंडी झाली.

प्रवाशांच्या त्रासाला आणि आर्थिक लुटीला जबाबदार कोण?

सातव्या वेतन आयोगाची मागणी करत संपावर गेलेल्या एसटी कामगारांमधून संताप व्यक्त होत असतानाच विविध पक्ष संघटनांसह सर्वच स्तरातून पाठिंबा वाढत असल्याने चिघळण्याच्या मार्गावर असणारे ‘एसटी बंद’ आंदोलन न्यायालयाच्या आदेशाने मागे घेण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रवासहाल थांबले. परंतु, संपाच्या काळात सर्वसामान्य प्रवाशांची झालेली परवड आणि खाजगी वाहतूकदारांकडून झालेली त्यांची लुबाडणूक याला जबाबदार कोण? असा प्रश्न मात्र, भेडसावल्याखेरीज राहत नाही.

एसटीची लालपरी रस्त्यावर धावू लागली असली, तरी आंदोलनामुळे ४ दिवस खोळंबलेल्या प्रवाशांची प्रचंड संख्या असल्याने आता एसटी बस गाडय़ांमध्ये सर्वसामान्यांचे तोबा गर्दी हाल सुरू झाले आहेत. दिवाळी सणामुळे लोकांची आपल्या गावी व निकटवर्तीय नातेवाइकांकडील ये-जा मोठी राहत असताना अचानक एसटी बंद आंदोलन सुरू झाल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांची आणि शासनाचीही कोंडी झाली. त्यात एसटीनेच प्रवास करणाऱ्या लोकांना खासगी वडापमधून प्रवास करणे अपरिहार्य बनताना, खासगी वाहनांची मर्यादित संख्या आणि प्रवाशांची झुंबड अशी परिस्थिती निर्माण होऊन या खासगी वाहनधारकांनी प्रवाशांची अडवणूक करून त्यांची अक्षरश: लुबाडणूक केली. कराड ते पुणे या १६५ किलो मीटरच्या अंतरासाठी प्रवाशांनी गाडय़ा तुडुंब भरून माणशी ६०० ते ७०० रुपये तर कराड ते मुंबई या सव्वातीनशे किलोमीटरसाठी हजार ते दीड हजार रुपयेही प्रवाशांकडून लुटण्यात आले. विशेष म्हणजे प्रशासन, पोलीस व परिवाहन खात्याने खासगी वाहनाने लोकांची प्रवासाची सोय केली होती. अशा व्यवस्थेतही लोकांना नाडवून आर्थिक हात मारण्यात खासगी वाहनधारकांनी यश मिळवीत दिवाळी साजरी केली आणि या प्रवासातून सर्वसामान्य जनतेचे दिवाळेच निघाल्याचे म्हणावे लागत आहे.

विविध पक्ष संघटनांसह सर्वच स्तरातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. एसटीच्या कामगारांवर कमी पगारामुळे निश्चितच अनेक वर्षे अन्याय होत असल्याचा सर्वसाधारण सूर होता. परंतु, ऐन दिवाळीत एसटीबंद आंदोलन छेडले गेल्याने त्याची सर्वाधिक झळ ही सर्वसामान्य जनतेलाच बसली. त्यामुळे शासनाची कोंडी करावयास गेलेल्या एसटीच्या संपकऱ्यांमुळे सर्वसामान्यांची मोठी परवड झाल्याचे चित्र होते. काही प्रवाशांनी तर, एसटी कर्मचाऱ्यांनी आज जसे आमचे हाल झाले तसेच राज्यकर्त्यांचे हाल बेहाल करण्याचे सक्त आंदोलन छेडण्याचे धाडस दाखवावे अशी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कामगारांचे आंदोलन न्यायालयाच्या आदेशाने विसावले असले, तरी मागण्यांसंदर्भात अंतिम तोडगा गुलदस्त्यात असल्याने संपकऱ्यांचा शासनावरील रोष कायम असून सकारात्मक तोडगा न निघाल्यास राज्यकर्त्यांना धडा शिकवू अशी आक्रमक भूमिका एसटी कर्मचारी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व भावना समजून घेतल्या. या मागण्या रास्त असल्याचा शेरा मारताना राज्य सरकारला एसटीचे खासगीकरण करावयाचे असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2017 2:57 am

Web Title: passengers stranded and looted by private bus owner during msrtc strike
Next Stories
1 बनावट आधारकार्डच्या माध्यमातून बेग टोळीच्या गुन्हेगारी कारवाया
2 महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी
3 शेकापचे ज्येष्ठ नेते भाई एस.एम.पाटील यांचे निधन
Just Now!
X