दिगंबर शिंदे, सांगली

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी राजकीय दबाव तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आरेवाडीमध्ये होऊ घातलेला धनगर मेळावा राजकीय वादात सापडला आहे. भाजपने ताकद देऊन यापूर्वी सुरू केलेला हा धनगर मेळावा मोडून काढण्यासाठी काही प्रमाणात भाजपचीच शक्ती यंदा कार्यरत झाली आहे.  या मेळाव्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असले तरी समाजापेक्षा नेत्यांचेच राजकीय भवितव्य या मेळाव्यात गुंतले असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यच्या पूर्वेला असलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे राज्यातील बहुसंख्य धनगर समाजाचे आराध्यदैवत. येथील यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय दरवर्षी राज्याच्या विविध भागासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून दाखल होत असतो. नवरात्रीमध्ये देवाची सेवा करण्यासाठी काही भाविक नित्यनियमाने आरेवाडीला हजेरी लावत असतात. झाडपिडी हा विधी करण्यासाठी काही हजाराने भक्त या ठिकाणी दरवर्षी जमा होतात. या काळात मंदिर परिसरातील स्वच्छता करणे, आजूबाजूला झाडलोट करणे, वृक्षारोपण करणे याचबरोबर काही विधायक चर्चा या वेळी घडत असते. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेत समाजातील युवा नेतृत्व असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळाव्याचे गेल्या तीन वर्षांपासून आयोजन सुरू केले आहे. या मेळाव्यामध्ये आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत चर्चा करून शासनदरबारी एक दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांसह शेजारील सांगोला, मंगळवेढा परिसरात धनगर समाज मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहे. हजारो एकर माळरान आणि या माळरानावरील गवतावर जगणारी मेंढपाळ कुटुंब अशी नैसर्गिक स्थिती असल्याने या परिसरात धनगर समाजाचे लक्षणीय वास्तव्य आहे. या समाजाची मतांच्या गणितामध्येही सरशी असल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या समाजातील शिवाजीराव शेंडगे यांना राजकीय क्षेत्रात आणले. शेंडगे बापूंनी समाजाच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. याचा लाभही शेंडगे घराण्याला राजकीय स्वरूपात वेळावेळी झाला. बापूंच्या पश्चात प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, विलास शेंडगे, जयसिंग शेंडगे ही मंडळी वेगवेगळ्या राजकीय पक्षात कार्यरत राहिली.

अलीकडच्या काळात शेंडगे कुटुंबातील सदस्यांना राजकीय विजनवास आला आहे. प्रकाश शेंडगे यांना गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये घेऊन विधानसभेत जतचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही दिली. मात्र, मागील निवडणुकीमध्ये नव्या राजकीय मांडणीनंतर भाजपने या ठिकाणी विलासराव जगताप यांना संधी देताच सत्तेपासून बाजूला गेलेले शेंडगे राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. मात्र, आजही धनगर समाजात बापूंच्या प्रेमापोटी शेंडगे कुटुंबावर श्रद्धा असणारे लोक या समाजात आहेत.

बदलत्या स्थितीमध्ये राष्ट्री समाज पार्टीतून आलेले गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजातील एकगठ्ठा मतांसाठीची जुळणी करण्याचा प्रयत्न केला. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या आकांक्षा वाढल्या. पक्षानेही खानापूर-आटपाडी मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी दिली. मात्र, सदाभाऊ पाटील आणि अनिल बाबर या आजी-माजी आमदारांच्या संघर्षांत पडळकर यांना मतदारांनी घरी बसविले. तथापि, व्यासपीठ गाजविणारे वक्तृत्व असल्याने भाजपमध्ये पडळकर यांच्या भाषणालाही मागणी होती. भाजपने त्यांना पक्षाचे प्रकाश शेंडगे यांच्या पक्षत्यागानंतर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी पक्षाचे स्टार प्रचारकही केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील तरुण अशी ओळख पडळकर यांनी जिल्ह्यात निर्माण केली होती. मात्र पक्षांतर्गत अन्य समाजातील नेत्यांचा रोष निर्माण झाल्याने त्यांची पक्षानेच अवनती करीत युवा भाजपचे जिल्हाध्यक्ष करून खालच्या पायरीवर बसविले. येथूनच पडळकर यांनी आता यापुढे आपले पक्षात फारसे स्थान नसल्याची जाणीव झाल्याने धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना सुरू केली. याचाच एक भाग म्हणून ऑगस्टअखेरीस औरंगाबाद येथे समाजाचा मेळावा घेऊन आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला.

भाजपमध्ये होत असलेली कोंडी दूर करण्यासाठी उपद्रव मूल्य दाखविण्याचे पडळकर यांचे प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून आरेवाडीच्या मेळाव्याकडे पाहिले जात आहे. १६ ऑक्टोबर रोजी हा मेळावा होणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले असून यासाठी तयारीही सुरू केली आहे. या मेळाव्यासाठी पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दकि पटेल यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी जमविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

तीन वर्षांपूर्वी पडळकर यांनीच आरेवाडीच्या बनात धनगर मेळावा सुरू केला. त्या वेळी भाजपने शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत केली. आता मात्र, सावध झालेल्या भाजपने या मेळाव्यापासून बाजूला राहण्याचीच भूमिका घेतली असून पडळकरांच्या मदतीला अन्य मंडळी सरसावली आहेत.

एकीकडे धनगर मेळाव्याची तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या प्रकाश शेंडगे यांनी या मेळाव्याला राजकीय स्वरूप देण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे आवाहन करीत हार्दकि पटेल यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचे सांगत मेळाव्याच्या हेतूलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. देवस्थान समितीने या मेळाव्याला अद्याप परवानगीच दिली नसल्याचे सांगत अप्रत्यक्ष पडळकरासोबत आम्ही नसल्याचे सांगितले. तर कितीही विरोध झाला तरी ठरलेल्या वेळेला आणि पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेणारच, अशी भूमिका पडळकर यांनी भूमिका जाहीर केली आहे.या समर्थन-विरोधाच्या पाश्र्वभूमीवर आता लोकसभेपूर्वीची खडाखडी आरेवाडीतील बिरोबाच्या साक्षीने होणार हे स्पष्ट झाले असून याला वेगवेगळे आयाम आहेत. पडळकर यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना टीकेचे लक्ष्य करीत असताना जिल्हा नेतृत्व करण्याच्या लायकीचा एकही नेता भाजपमध्ये नसल्याचे सांगून या पक्षांतर्गत मतभेद तीव्र करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या आठवडय़ात पडळकर यांचा वाढदिवस झाला. या निमित्ताने आटपाडी तालुक्यातील बहुतांशी गावात लागलेले डिजिटल फलक मिशन लोकसभा सांगत होते. म्हणजे लोकसभेसाठी भाजपमधूनच बंडखोरी करीत पडळकर मदानात उतरण्याची चिन्हे दिसत असली तरी या खेळाला काँग्रेस आघाडीकडून पािठबा नसला तरी खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर आरेवाडीच्या बनात दोन धनगर मेळावे झाले तर नवल वाटणार नाही. मात्र, नेहमीच्या जागेऐवजी वेगवेगळी जागा दिली जाईल आणि नेमके तेच अपेक्षित आहे. या निमित्ताने पडळकर यांना आपली ताकद दाखवायची आहे. ही ताकद विभागली गेली तर खासदारकी अडचणीत येऊ शकते याची जाणीव झालेल्या भाजपने शेंडगे यांच्या माध्यमातून विरोधाची धार अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

धनगर समाजाच्या हक्काचे असलेले आरक्षण मिळावे यासाठीच आरेवाडीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून येत्या तीन महिन्यात आचारसंहिता लागू होईल. तत्पूर्वी याबाबत राजकीय पक्षांनी धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा त्यानंतर या प्रश्नावर समाजाच्या आंदोलनाची दिशा या मेळाव्यात निश्चित करण्यात  येईल. या मेळाव्यास कर्नाटकचे  माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया, आ. गणपतराव देशमुख, नारायण पाटील, रमेश शेंडगे आदी उपस्थित राहणार आहेत. समाजाच्या सर्व पक्षातील नेत्यांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

 – प्रकाश शेंडगे, माजी आमदार