|| दिगंबर शिंदे

नाराजांचा पक्षप्रवेश; काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता; साखर पट्टय़ात वर्चस्वासाठी संघर्ष

सांगली :   पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी  राष्ट्रवादीने नाराजांना गोंजारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सत्तेत सहभागी असलेली काँग्रेस अद्याप पराभूत मानसिकेतून सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना बाहेर पडून अपक्ष विधानसभेच्या मदानात उतरलेले सदाशिवराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला, तर आष्टा येथील वैभव शिंदे यांच्यासह काही दिग्गज राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत.

खानापूर-आटपाडी मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील हे काँग्रेसमध्ये नाराज होते.  युतीच्या काळामध्ये या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे आ. अनिल बाबर हे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी. त्यांचे आणि भाजपच्या नेत्यांचे आपुलकीचे संबंध जगजाहीर असताना खासदार गट मात्र तासगाव तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद गटाच्या ताकदीवर बाबर यांना त्रासदायक ठरत होता. तरीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मदत बाबरांना व्हावी यासाठी लोकसभेवेळी विरोधात लढलेल्या गोपीचंद पडळकर यांची मदत बाबर यांच्या पारडय़ात टाकण्यात आली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

राज्यात सत्ता समीकरणे बदलल्याने बाबर यांची कोंडी झाली आहे. मुळात ते राष्ट्रवादीचे. राष्ट्रवादीत असताना त्यांचा निकटचा संबंध हा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्याशी होता. यशवंत कारखान्यावरून त्यांचा खासदार संजयकाका पाटील यांच्याशी वाद आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवबंधन हाती बांधले. आता ते जिल्ह्य़ातील शिवसेनेचे एकमेव आमदार असले तरी संघटनेच्या अन्य कार्यकर्त्यांशी त्यांची फारशी जवळीक दिसत नाही.

बाबरांचा खरा सामना सदाशिवराव पाटील यांच्याशी आहे. त्याच पाटलांना राष्ट्रवादीने सन्मानाने पक्षात घेतले आहे. सत्तेच्या वळचणीला आता विटय़ातील दोन्ही विरोधक एकाच पंगतीला बसणार आहेत. यात कोंडी होणार आहे ती बाबर यांचीच.

मिरजेत झालेल्या गुलाबराव पाटील ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभास वसंतदादा गटाचे विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पाठ फिरवली होती. मात्र दादा गटाच्या नेत्या श्रीमती पाटील यांनी पवारांचे स्वागत करून आपली दिशा कोणती आहे याची चुणूक दाखवली आहे. कार्यक्रमामध्ये दादा गटाची अनुपस्थिती हेरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद  पवार यांनी सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा थोडक्या मतांनी पराभव होण्यास काँग्रेसचा प्रचारातील हात आखडता ठेवण्याचे धोरणच जबाबदार असल्याचे अप्रत्यक्ष सांगत काँग्रेसअंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले. याच कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची उपस्थिती होती.

काँग्रेसने पक्ष वाढीसाठी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावर सांगली व सोलापूर जिल्ह्य़ाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे ते कार्यकारी अध्यक्षही आहेत. मात्र मंत्रिपद स्वीकारल्यानंतर जाहीर सत्काराच्या निमित्ताने सांगलीत आल्यानंतर शहराच्या अथवा जिल्ह्याच्या काय समस्या आहेत यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली नाही. समस्यांची माहिती घेण्यासाठी केवळ आढावा बठकीची औपचारिकता पूर्ण केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास अथवा, पक्षाची बांधणी करण्यास त्यांना वेळ केव्हा मिळणार हा प्रश्न आहे.

भाजपला शह देण्याची खेळी

आष्टा येथील वैभव शिंदे यांनाही राष्ट्रवादीमध्ये आणण्याचे खुद्द प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री जयंतराव पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. विलासराव शिंदे यांच्या निधनाने या गटाचे नेतृत्व वैभव शिंदे यांच्याकडे आले आहे. भाजपने जयंत पाटील यांना शह देण्यासाठी त्यांना पक्षात घेऊन पदाधिकारी केले. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत आष्टा येथे अप्पर तहसील कार्यालय दिले. असे असतानाही नव्या राजकीय मांडणीत त्यांनाही पक्षात आणण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीचे सुरू आहेत.

काँग्रेसच्या कार्यशील कार्यकर्त्यांना शासकीय समितीमध्ये काम करण्याची संधी मिळावी आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कामाची संधी मिळावी यासाठी शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रयत्नशील असून सर्वसहमतीने नावे निश्चित करण्यात येतील. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरू आहे

-पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस

स्थानिक निवडणुकांसाठी पक्ष ताकदीने उभा करण्याचे काम करण्यात येत असून पदाधिकारीही नव्या जोमाने कार्यप्रवण झाले आहेत

-कमलाकर पाटील, विधानसभा क्षेत्राध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.