लातूर : करोनाचा संसर्ग जिल्ह्य़ात अतिशय झपाटय़ाने वाढत असून तपासणीच्या प्रमाणात करोनाबाधितांचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. गुरुवारी जिल्ह्य़ात ५२५ करोनाबाधित होते, तेव्हा करोनाबाधितांचे एकूण प्रमाण १४.४६ होते. शुक्रवारी ५३८ जण करोनाबाधित आढळले व करोनाबाधितांचे प्रमाण तब्बल २४.४ टक्क्य़ांवर पोहोचले.

जिल्हाभरात आता तीन हजार ४०२ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी दोन हजार ४७८ रुग्ण गृह विलगीकरण कक्षात आहेत, तर ९२८ जण विविध करोना केंद्रात उपचार घेत आहेत. शनिवारपासून जिल्ह्य़ातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी पोलिसांचा ताफा शहरातील चहाच्या टपऱ्या, रस विक्रेते यांच्याकडे वळला व विविध पोलीस ठाण्यात सकाळीच अनेक छोटय़ा विक्रेत्यांना बसवून ठेवण्यात आले. वास्तविक मोठय़ा विक्रेत्यांना करोनाची चाचणी करून व्यवसाय करण्यास परवानगी आहे. बीअरबार व रेस्टॉरंट यांना पार्सलची सुविधा देता येते तर हीच सुविधा या छोटय़ा व्यावसायिकांना का नाही, याचे उत्तर प्रशासनाच्यावतीने दिले जात नाही.

लातूरसारख्या मोठय़ा शहरात केवळ शहरातील गांधी चौकात चार पोलीस व दोन महापालिका कर्मचारी दंडाच्या पावत्या फाडण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभर लातूर, औसा, लामजना, उमरगा आदी रस्त्यावरील रसवंतिगृहचालकांना त्या भागातील पोलिसांनी केवळ पार्सल द्या, लोकांना थांबवून गर्दी करू नका, असा सज्जड दम दिला.

हिंगोलीत करोनाचा उद्रेक १८६ नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

हिंगोली : जिल्ह्यत दिवसेंदिवस करोनाचा उद्रेक वाढतच आहे. शुक्रवारी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालावरून नव्याने १८६ रुग्ण आढळून आले.आतापर्यंत एकूण ५ हजार ८७९ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५ हजार १७३ रुग्ण बरे झाले. वसमत तालुक्यातील पार्डी बागल येथील ६७ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ७९ वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ६२७ आहे. यामध्ये ५७ रुग्णांची प्रकृती गंभीर असून ५० रुग्ण ऑक्सिजनवर तर ७ अतिगंभीर रुग्ण बायपँप मशीन वर ठेवले असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.