हेडगेवारांच्या निवासस्थानी मुखर्जीचा अभिप्राय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार  हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत, असा अभिप्राय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी डॉ. हेडगेवार स्मारकाच्या नोंदवहीत नोंदवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी शहरात आले असता त्यांनी कोठी रोड येथील डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच नोंदवहीत हेडगेवार यांची प्रसंशा केली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी त्यांच्यासोबत होते. संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे यांनी मुखर्जी यांचे स्वागत केले. यावेळी मुखर्जी यांनी हेडगेवार यांनी वापरलेल्या साहित्याची माहिती करून घेतली.

मुखर्जी-भागवत यांची अर्धा तास चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्य्या समारोपासाठी आलेले प्रणव मुखर्जी यांचे हेडगेवार निवासस्थानावरून रेशीमबागेतील स्मृतीभवन परिसरात आगमन झाले. आगमनानंतर त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि त्यानंतर सहसरकार्यवाह भय्याजी जोशी आणि इतर पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. प्रणव मुखर्जी यांनी जवळपास अर्धा तास भागवत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्मृतीभवन परिसराची पाहणी केली. संघाची नवीन इमारत तयार होत असल्यामुळे त्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. चर्चा आणि समाधीचे दर्शन घेतल्यावर कार्यक्रमस्थळी आले. वर्गाचे सर्वाधिकारी यांनी प्रास्ताविक केले, तर महानगर संघचालक राजेश लोया यांनी प्रमुख उपस्थितांचा परिचय करून दिला. वर्ग कार्यवाह श्याम मनोहर यांनी २५ दिवस चाललेल्या वर्गातील विविध उपक्रमाची माहिती दिली.

ऐनवेळी ठरली  हेडगेवार निवासस्थानची भेट

मुखर्जी यांच्या अधिकृत दौऱ्यात ही भेट नव्हती. ऐनवेळी हा कार्यक्रम ठरला. येथून काही अंतरावरच संघाचे मुख्यालय आहे, परंतु तेथे जाण्याचे टाळले. या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे भागात वाहतुकीची कोंडी झाली होती.

काँग्रेसजनांची पाठ

काँग्रेसच्या संघटनेत तयार झालेले आणि पक्षात विविध महत्त्वाची पदे भूषवलेले प्रणव मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्याने काँग्रेसजन नाराज होते. त्यामुळे मुखर्जी नागपुरात असतानाही काँग्रेसचा एकही पदाधिकारी प्रणव मुखर्जी यांना भेटण्यासाठी गेला नाही.

या मान्यवरांची लाभली उपस्थिती

संघाच्या या समारोपीय कार्यक्रमाला लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री, पत्नी मिरा शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू अदेन्दु बोस, त्यांची पत्नी पेरमीन आणि मुलगा, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक राजीव मल्होत्रा, मफतलाल कंपनीचे प्रमुख विशद मुफतलाल, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू कल्याण चौबे, अभिनेते गजेंद्रसिंग चौहाण, भाजपचे नेते संजय जोशी, उद्योजक राजेंद्र प्रसाद, संजय लालभाई, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नाना शामकुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय नसलेले आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय जोशी संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला उपस्थित झाल्यावर त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अभिनेते गजेंद्रसिंह कार्यक्रम स्थळी आले असताना त्यांच्यासोबतही कार्यक्रम स्थळी चर्चा केली. या कार्यक्रमाच्या वृतांकनाठी देशभरातील माध्यम प्रतिनिधी नागपुरात आले होते.