24 October 2020

News Flash

‘जामीन मिळूनही आर्थिक स्थितीमुळे कैदी तुरूंगात’

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कारागृहात हजारांहून अधिक बंदी पडून

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

न्यायालयाकडून जामीन मिळूनही निव्वळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे राज्यातील कारागृहात हजारांहून अधिक बंदी  पडून आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. तसे झाल्यास कारागृह प्रशासनावरील अतिरिक्त ताण आपसूक कमी होईल. न्यायालयाने जामीन दिलेल्या बंदी बांधवांना समाजात सन्मानाने वावरता येईल, असे मत महाराष्ट्राचे तुरुंग महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले.

येथील जिल्हा कारागृहात वृक्षारोपण आणि बंदी बांधवांसाठी ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला. जाधव यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, भारत कोकाटे, अ‍ॅड. पांडुरंग लोमटे, वसंत नागदे, कारागृह अधीक्षक भगुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यातील कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा अधिक बंदी आहेत. त्याचा अतिरिक्त ताण कारागृह प्रशासनाला सहन करावा लागत आहे. त्यातच हजाराहून अधिक बंदीजनांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांचा जामीन घेण्यासाठी केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे नातेवाईक अथवा हितचिंतक समोर येत नाहीत. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे राज्याच्या विविध कारागृहात हजाराहून अधिक पुरुष, महिला बंदी पडून आहेत. लातूरमध्ये एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेत अशा बंदींना पुन्हा एकदा समाजात सन्मानाने वावरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्यभरातील विविध संस्था, संघटनांनी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे जामीन मिळूनही कारागृहात खितपत पडलेल्या बंदींप्रती गांभीर्याने विचार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरी हा मानवी मनाला उभारी देणारा महत्त्वाचा आध्यात्मिक ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीतील जीवनविषयक तत्त्वज्ञान बंदी बांधवांसमोर मांडत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील अनेक कारागृहातून पाहावयास मिळत असल्याचे ते म्हणाले.

तुळजाभवानी संस्थानकडून जलशुद्धीकरण यंत्र

जिल्हा प्रशासन कारागृहाला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी तत्पर आहे. लवकरच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने कारागृहातील बंदीसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गमे यांनी दिली. कारागृहातून बाहेर आलेला माणूस कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले. सूत्रसंचालन सहायक तुरुंग अधिकारी इगवे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 12:59 am

Web Title: prisoners in jail due to financial condition
Next Stories
1 शेतकरी स्वावलंबी मिशनचे फलित काय?
2 राज्यातील केवळ सात सूतगिरण्या नफ्यात?
3 निवडणुका, आपत्ती, खड्डय़ांमध्ये सरले वर्ष
Just Now!
X