पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवर आरोप

सिंचनासंदर्भातील श्वेतपत्रिका, शिखर बँकेची चौकशीचे निर्णय मित्रपक्ष राष्ट्रवादीला आवडले नव्हते. यामुळे त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी केली नाही. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्याची संधी गमावली, असा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

चव्हाण आज येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिखर बँकेवर प्रशासक नियुक्त केल्यावर तोटय़ातील बँक नफ्यात आली. तसेच सिंचनाबाबत आरोप होत असल्याने श्वेतपत्रिका काढली. यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी नाराज झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतांची टक्केवारी ३५ टक्के आहे तर भाजपची २७ टक्के आहे. यामुळे निवडणूक मिळून लढावी, असे मी सांगत होतो. परंतु मित्रपक्ष यासाठी तयार नव्हता. त्याचा लाभ भाजपला झाला, मात्र या वेळी आम्ही आघाडीसाठी तयार आहोत, असे चव्हाण म्हणाले.

सिंचन घोटाळ्याची चौकशी केवळ फार्स

फडणवीस सरकारने सिंचन घोटाळ्याची चौकशी केवळ विरोधी पक्षावर टांगती तलवार राहावी म्हणून लावली आहे. ती एक चतुर राजकीय खेळी आहे. परंतु त्याने फारसे काही साध्य होणार नाही. समृद्धी महामार्ग प्रकरणातही जी चौकशी केली जात आहे ती चौकशी केवळ वेळ मारून नेण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.

एलबीटी रद्द करण्याचा निर्णय मूर्खपणाचा

राज्यातील महापालिकांमधून वर्षांला सुमारे ७ हजार कोटींचा स्थानिक स्वराज्य संस्था कर गोळा होत होता. भाजप सत्तेत आल्यानंतर एलबीटी रद्द केला. हा मूर्खपणाचा निर्णय होता. जीएसटी लागू केल्यानंतर राज्याला केंद्राकडून जीएसटी बदल्यात पाच वर्षांत जो ३५ हजार कोटींचा मोबदला मिळाला असता, त्यावर पाणी फिरवले गेले, असेही चव्हाण म्हणाले.