प्रवासी घेऊन पुण्याकडे निघालेल्या खासगी बसने अचानक पेट घेतला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधाने बसमधील ३४ प्रवासी बचावले. बस मात्र पूर्ण जळून खाक झाली. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

खासगी बस ही नांदेडकडून आष्टी-अहमदनगर माग्रे पुण्याकडे निघाली होती. धावत्या बसला अचानक आग लागल्याने गाडीत एकच गोंधळ उडाला. आग लागल्याच्या लक्षात येताच चालक अशोक कचरू बोराडे (रा.परभणी) यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी तत्काळ रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि  प्रवाशांना खाली उतरविले. पहाटेची वेळ असल्याने जवळपास आग विझविण्यासाठी पाणी किंवा अन्य साहित्य नसल्याने काही वेळातच पूर्णपणे बस जळून खाक झाली.

आगीची तीव्रता एवढी होती की बस जळून केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला होता. घटनास्थळी आष्टी तालुक्यतील कडा पोलिसांनी भेट दिली.