डहाणू : शहरातील पारनाका येथे राहणाऱ्या एका प्राध्यापकांस तुमची के वायसी संपलेली आहे असे सांगून बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून ऑनलाइन ४५,९७९ रकमेचा गंडा घातल्या प्रकरणी डहाणू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित प्राध्यापकाचा मोबाइल हॅक करून पेटीएम, फोन पे, फँक्स मार्ट, फ्रिरिचार्ज पेमेन्टमधील पैसे वर्ग करून फसवणूक करण्यात आली असून डहाणू पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डहाणू पारनाका येथे राहणाऱ्या तक्रारदार प्राध्यापकांस रविवारी मोबाईल क्र.८४४६६९८४१८ वरून फोन करून के वायसी काढण्यासाठी securegw.paytm.in या साईटवर जावून team viewer quick support हे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानतंर त्यांचा मोबाइल हॅक करून पेटीएम, फोन पे, फँक्स मार्ट, फ्रिरिचार्ज पेमेंन्ट, acceiyst solutions या माध्यमातून १ रुपया, ९९९९ रुपये, ९९९९ रुपये, ९९९० रुपये, ९९९० रुपये, २००० रुपये, २००० रुपये, २००० रुपये असे एकूण ४५,९७९ रुपये रक्कम पैसे वर्ग करून एक तासाच्या आत गंडा घातल्याचा प्रकार रविवारी दुपारी १.३० ते २.४० दरम्यान घडला.

सायबर पोलीस दलाकडून आवाहन

पालघर जिल्ह्यात अशा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडत असून बँक संबंधित माहिती कोणालाही देऊ नका. कोणतीही बँक आपणास फोनव्दारे तुमचे बँक खाते, एटीएम कार्ड किंवा के वायसी संबंधित माहिती विचारत नाही. अशा प्रकारची माहिती आपणास कोणी विचारल्यास तात्काळ आपले बँक किंवा पोलीस ठाणे यांचेशी संपर्क साधण्याचे सायबर पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.