स्टंटबाजी करताना प्रकार; प्राण वाचविण्यात यश

आंदोलनात स्टंटबाजी करीत असताना जिवावर बेतण्याचा प्रकार सोमवारी सांगलीत घडला. प्रतिकात्मक गळफास आंदोलनावेळी सांगलीच्या स्टेशन चौकात खराखुरा फास लागलेल्या या कार्यकर्त्यांचे प्राण वाचविण्यात सुदैवाने यश आले.

काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकात निदर्शने करण्यात येत होती. मोदी सरकारच्या काळात राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक शेतकरी आत्महत्येचा प्रसंग निदर्शनावेळी करण्यात येत होता. यावेळी संतोष पाटील याने स्वत:ला गळफास लावून घेतला होता. मात्र हे करीत असताना खरोखरच गळफासाची गाठ त्याच्या गळ्याला आवळू लागली. यावेळी तो तडफडू लागला. मात्र ही स्टंटबाजीच असल्याचे अन्य निदर्शकांना वाटत होते. मात्र तो यामुळे ज्यावेळी बेशुध्द पडला त्यावेळी खरा प्रकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आला. त्याला तत्काळ पाणी पाजून शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. यानंतर त्याला वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले. सुदैवाने तो बचावला.  अन्य एका घटनेत आष्टय़ाजवळ बागणी येथे एका तरुण शेतकऱ्याने जमिनीतील रस्त्यासाठी शोले स्टाईल आंदोलन सोमवारी सकाळी केले. मात्र या प्रकाराने महसूल विभागाबरोबर पोलिसांचीही काही काळ झोप उडाली.बागणी येथील शेतकरी शिवाजी पेटकर याने शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांनी रस्ताही मंजूर केला.