पालघरमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची परवड; एसटी आगारात एकाच संगणकावर भार

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळाच्या सेवेमध्ये सवलतीचा लाभ मिळावा म्हणून स्मार्ट कार्ड सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड घेण्यासाठी प्रत्येक एसटी आगारात सध्या एकच संगणक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळविण्यासाठी चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पालघर आगारामध्ये स्मार्ट कार्डची सुविधा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावीला कंटाळून विद्यार्थी व पालकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठांकडे तक्रार नोंदवली आहे.

एसटी महामंडळाने सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्डचा वापर बंधनकारक केला आहे. या स्मार्ट कार्डची नोंदणी १ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक एसटी आगारामध्ये स्मार्ट कार्डच्या नोंदणीसाठी एकच संगणक वर्ग करण्यात आला असून ऑनलाइन नोंदणीसाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यर्थ्यांची मोठी रांग लागल्याचे दिसून येत आहे.

पालघर एसटी आगारामध्ये एका विद्यर्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचा अवधी लागत असून अनेक विद्यर्थी या रांगेमध्ये सहा ते आठ तास उभे राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. शालेय व लहान विद्यर्थ्यांसोबत त्यांचे पालकदेखील रांगेत उभे राहत असून काल दुपारी बारा वाजता उभे राहिलेल्या माहीम-वडराईच्या महाविद्यालय विद्यर्थ्यांना रात्री नऊ  वाजेपर्यंत थांबल्यानंतरदेखील स्मार्ट कार्डची नोंदणी झाली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

स्मार्ट कार्ड नोंदणीचे काम जलदगतीने व्हावे तसेच या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अरेरावीपणाला कंटाळून विद्यार्थ्यांनी पालघर आगर व्यवस्थापकांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांना विभागीय नियंत्रक कार्यालयात जा असे सांगून हुसकावून लावल्याचे संतप्त विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. पालघर आगारातील स्मार्ट कार्डची नोंदणी करणारे कर्मचारी हे आपल्या कामात सावकाशपणे करत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. परिणामी दररोज पालघर आगारांमध्ये ५० ते १०० विद्यार्थी या स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी आपले अभ्यासक्रम बुडवून उभे राहत असल्याचे दिसून आले आहे.

स्मार्ट कार्डची नोंदणी करताना राज्य परिवहन विभागाने दिलेला अर्ज व शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांला दिलेले ओळखपत्र घेऊन येणे अपेक्षित आहे. तसेच हे कार्ड काढताना संपूर्ण महिन्याच्या सवलतीची रक्कम भरावी लागत असून प्रत्यक्षात स्मार्ट कार्ड उपलब्ध होण्यासाठी १२ ते १५ दिवसांचा कालावधी लागत आहे.

‘राज्यातही हीच स्थिती’

राज्यभरात प्रत्येक आगारामध्ये स्मार्ट कार्डचा नोंदणीसाठी फक्त एकच संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यर्थ्यांची गैरसोय होत असल्याचे पालघर विभागीय नियंत्रक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात विचारणा केली असता मान्य केले. या कामी संगणकाची संख्या वाढवावी, तसेच संगणकावर नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे हा मुद्दा आपण वरिष्ठ कार्यालयाकडे उपस्थित करणार असल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या पालघर विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.