काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा डीएनए हा सावरकर द्वेषाचा आहे. सोनिया गांधींकडून तो त्यांच्यात आला आहे अशी बोचरी टीका भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केली. राहुल गांधी यांचं आडनाव गांधी आहे मात्र महात्मा गांधी आणि त्यांचा काहीही संबंध नाही. महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांनी एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये १९२० मध्ये यंग इंडिया या साप्ताहिकात महात्मा गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले होते. सावरकरांनी कोणताही हिंसाचार केला नाही. कोणीही सावरकर यांच्या सन्मानाबाबत आणि सच्चेपणाबाबत प्रश्न उपस्थित करु शकत नाही असं महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं.

“देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनीही एक पत्र लिहून सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. राजकीय मतभेद असू शकतात. मात्र एखाद्या व्यक्तीच्या कार्याबद्दल संशय घेणं चुकीचं असल्याचं राम नाईक यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मतं मांडली आहेत.

सोनिया गांधी यांचं उदाहरणही राम नाईक यांनी दिलं. ” २००३ मध्ये मी पेट्रोलियम मंत्री होतो. त्यावेळी वीर सावरकर यांचं तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात यावं असा प्रस्ताव मी सगळ्यांसमोर मांडला होता. माझ्या प्रस्तावाला त्यावेळी सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. मात्र सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू असं व्हीप काढलं होतं.” असं राम नाईक यांनी म्हटलं आहे.

रेप इन इंडियाच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोलताना माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही असं म्हणत मी माफी मागणार नाही असं राहुल गांधींनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात टीकेची झोड उठली.